छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करता सोडून देण्यासाठी बारा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षकाला बारा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. फारूक गफुर देशमुख (वय ५४), असे लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार हा ४८ वर्षीय व्यक्ती असून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची धमकी फारुक देशमुख यांनी दिली होती. गुन्ह्यातून वगळून वरचेवर सोडून देण्यासाठी त्यांनी १५ हजाराची लाच मागीतली होती.
अखेर तडजोड होवून १२ हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रारी केली होती. त्यानुसार पथकाने गुरुवारी (दि. ५) लाच मागीतल्याबद्दलची खात्री करुन शुक्रवारी (दि.६) सापळा लावला. येथे त्यांनी लाच स्वीकारली आणि संशय आल्याने पळून गेला. यानंतर पथकाने पाठलाग करून पकडले.
या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, उपअधिक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संतोष देशमुख, जमादार रवींद्र काळे, पी. एन. पाठक, पाठक, साईनाथ तोडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
















