मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीच्या कारवाईबाबत आणखी मोठा गौप्यस्फोट झाला आहे. एनसीबीच्या दुसऱ्या कारवाईबाबत एका पंचाने गौप्यस्फोट केला आहे. खारघरमधील कारवाईच्या वेळी १० कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा नायजेरियन नागरिकाच्या अटकेतील कारवाईतील पंच शेखर कांबळे यांनी केला आहे. खारघरमध्ये नायजेरियन नागरिकाला अटक झाली होती. यामध्ये पंच असलेले शेखर कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.
शेखर कांबळे असं या पंचाचं नाव असून तो नवी मुंबईत राहतो. खारघर येथील एका प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पंच बनवलेलं आहे. नायजेरियन नागरिकांवर झालेल्या कारवाईचं हे प्रकरण आहे. या प्रकरणात ज्या दोघांना पकडण्यात आलं होतं, त्यांच्याकडं कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. असं असतानाही त्यांच्याकडं ६० ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचं नमूद करण्यात आलं, असं कांबळे यांनी सांगितलं. नायजेरियन प्रकरणात शेखर कांबळे व त्याच्या एका मित्राला पंच साक्षीदार बनवण्यात आलं होतं. दहा कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. याबद्दल विचारणा केली असता ‘आम्ही त्यावर नंतर लिहू’ असं त्यांना सांगण्यात आलं होतं.
आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीची एकेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. एनसीबीच्याच एका अधिकाऱ्यानं काल एक निनावी पत्र व्हायरल केलं आहे. त्यात खारघरच्या प्रकरणाचा उल्लेख आहे. त्यामुळं घाबरलेल्या शेखर कांबळे यानं आज मीडियासमोर येण्याचा निर्णय घेतला. समीर वानखेडे आणि त्यांचा ड्रायव्हर अनिल माने हा मला अधूनमधून फोन करायचा. ड्रग्जवाले नायजेरिन कुठं असतील तर सांग, असं त्याला सांगितलं जायचं. एनसीबीच्या अधिकाऱ्याचं निनावी पत्र व्हायरल झाल्यानंतर शेखर कांबळेला अनिल मानेचा फोन आला होता. तू काही बोलू नको, असं अनिल मानेनं सांगितल्याचं शेखर कांबळे यांनं म्हटलं आहे. ‘कारण नसताना आम्ही यात अडकलो आहे. पण चौकशीसाठी बोलावल्यास आम्ही तयार आहोत, सत्य आहे ते सांगू,’ असं त्यानं म्हटलं आहे.