मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तसे अधिकृत आदेशच जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे हा एटीएसला एक धक्का असल्याचे मानले जात आहे.
मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. ही गाडी मनसुख हिरेन यांचीच होती. मात्र त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास ATS करत होती. मात्र आता हा तपास एनआयएने आपल्या ताब्यात घेतला आहे. स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणाचा तपासही एनआयए करत आहे. याप्रकरणी आधीच सचिन वाझे यांना अटक झाली आहे. सुरूवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत होते, मात्र केंद्र सरकारने तो एनआयएकडे सोपवला. दरम्यान, अंबानींच्या घरासमोरील कारमधली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांवरून भाजपने ठाकरे सरकारला घेरलेलं आहे. विधिमंडळ अधिवेशन काळातही विरोधी पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळाला. राणे कुटुंबियांनी शिवसेनेवर आरोपही केले. तसंच हा तपास एनआयएनेच करावा, अशी मागणी सातत्याने लावून धरली.
आता या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपावण्यात आल्याने ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र हा निर्णय स्वागतार्ह असून लवकरच सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च या दिवशी आढळला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. हिरन आत्महत्या केली की त्यांच्या खून करण्यात आला हे अजूनही उघड झालेले नाही. मात्र, मनसुख हिरेन यांची हत्याच झाली आहे, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.