मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभरात चर्चेत असलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचं गुढ उकललं असल्याचा दावा दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी केला आहे. शिवदीप लांडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत खात्यावर ही माहिती दिली आहे. याबाबत सोमवारी पत्रकार परिषदही घेतली जाण्याची शक्यता आहे.
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तशी माहिती खुद्द एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी दिली आहे. लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये त्यांनी सॅल्यूट ठोकणारा एक फोटो टाकला आहे. तर अती संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
‘माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची केस’
“अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण ATS पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. ज्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे. त्यामुळे या केसमध्ये न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे. ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटील केसमधील एक आहे”, असं शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या टीमने २ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना दुपारी कोर्टात हजर केलं. त्यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींची ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी शनिवारी एटीएसने सचिन वाझे यांचीही कोठडी मागितली होती. त्यावर कोर्टाने म्हटलंय की, वाझेची कोठडी २५ मार्चनंतर मिळेल. मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसने एक बुकी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. नरेश धरे असं अटक करण्यात आलेल्या बुकीचं नाव आहे. तर विनायक शिंदे हा मुंबई पोलिसांतील माजी कॉन्स्टेबल असलेल्या आरोपीला अटक केली आहे. विनायक शिंदे हा लखन भैया एन्काऊंटर प्रकरणातील दोषी आहे. तो सध्या पॅरोलवर बाहेर आहे.