मुंबई (वृत्तसंस्था) एनसीपीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केतकी चितळेवर हल्ला करण्यात आला आहे. तसेच शाईफेक अंडीही फेकण्यात आली. नवी मुंबई पोलीस केतकीला नेत असताना हा सर्व प्रकार घडला.
केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांनी अनेकदा चर्चेत असते. यावेळी केतकीनं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी केतकीविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर दिली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांचे आभार त्यांनी मानले आहेत.
तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी केतकी चितळेचा निषेध व्यक्त केला आहे. पुण्यात महाविकास आघाडीतर्फे केतकी चितळेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे, काँग्रेसच्या नेत्या कमलताई व्यवहारे, शिवसेना युवती प्रमुख मनीषा धारणे उपस्थित होत्या.
राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावलं
या प्रकरणात आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रक काढून केतकी चितळेचा निषेध नोंदवलाय. राज ठाकरेंच्या त्यांच्या पत्रकात म्हटलंय की, “कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो.