भुसावळ (प्रतिनिधी) पोलिसांना गुन्ह्यात हवा असलेला संशयित पकडण्यासाठी शहरातील मुस्लिम कॉलनीतील बडी खानका या भागात गेलेल्या बाजारपेठ पोलिसांना तेथील महिलांनी मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
बाजारपेठ पोलिसांना एका गुन्ह्यात संशयीत हसन अली नियाज अली उर्फ आसु हवा असल्याने तो शहरात आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक शहरातील मुस्लीम कॉलनीतील बडी खानका या भागात गेल्यानंतर संशयीत हसनला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्या भागातील महिला फातीमा बी, रूकया, मरीयम, नाजीया यांच्यासह दोन अनोळखी महिलांनी संशयीताला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करीत शिविगाळ केली. पोलिसांविरोधात तक्रार करण्याची धमकी देत कपडे फाडून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी पोलिस प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महिलांसह हसन अलीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहे.