जळगाव (प्रतिनिधी) जळगाव गुन्हे शाखेने अट्टल मोटारसायकल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने अडावद हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्यासोबतच अडावद व धरणगाव हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. प्रवीण लोटन कोळी (30, सुटकार, ता.चोपडा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार अनिल जाधव, रवी नरवाडे, हेमंत पाटील, बबन पाटील आदींच्या पथकाने केली. आरोपीच्या ताब्यात चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून संशयिताला अडावद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.