धरणगाव (प्रतिनिधी) न मागता पैसे पाठवून नंतर अधिकचे पैसे उकळण्यासाठी तरूणाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांनी पिडीत तरुणाच्या मोबाईलमधील कॉन्टॅक लिस्ट हॅक करत, त्याचे बनावट अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणाने धरणगाव पोलिसात रीतसर तक्रार दिली आहे.
धरणगाव तालुक्यातील एका छोट्या गावातील ३५ वर्षीय तरुणास ७ ऑक्टोबर रोजी एका नंबरवरून ‘गुगल पे’ १९२० रुपये आले. अचानक आलेल्या पैशांमुळे तरुण थोडा गोंधळला. परंतू नजर चुकीने कुणी टाकले असतील. संबंधिताचा फोन आल्यावर त्याला आपण परत करू म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. परंतू यानंतर खरा खेळ सुरु झाला. पैसे पाठवणाऱ्या नंबरवरील अज्ञात ठगाने पिडीत तरुणाला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली.
तुम्ही आमच्या कडून १९२० रुपये कर्ज घेतले आहे. त्यामुळे आता तुम्ही ३२०० रुपये मी सांगतो, त्या लिंकवर भरा. अन्यथा तुमचे बनावट अश्लिल फोटो तुमच्याच मोबाईलमधील कॉन्टॅक लिस्टमधील लोकांना आम्ही सेंट करून तुमची बदनामी करू. धक्कादायक म्हणजे पिडीत तरुणाने त्याच्या मोबाईलमध्ये ज्या पद्धतीने मित्र, नातेवाईक यांचे नंबर सेव्ह केले होते, त्याचाच स्क्रीनशॉट समोरच्या भामट्याने पाठवला. एवढेच नव्हे तर, व्हॉट्सअॅप डीपीचा फोटो तसेच पॅनकार्डचा फोटो देखील पाठवला.
मोबाईलमधील कॉन्टॅक लिस्ट जशीच्या तशी आल्यामुळे पिडीत तरुणाच्या लक्षात आले की, कुणी तरी आपला मोबाईल हॅक केला आहे. भामट्याने आज सायंकाळी पुन्हा एकदा फोन करून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला. परंतू संबंधित तरुणाने मी तुमच्याकडे कोणतेही पैसे मागितले नव्हते. तुम्हीं जबरदस्ती पाठवले होते. मी याबाबत पोलिसात रीतसर तक्रार केली असल्याचे सांगताच समोरच्या भामट्याने शिवीगाळ सुरु केली. त्यामुळे पिडीत तरुणाने नंबर ब्लॉक करून टाकला. दरम्यान, धरणगाव तालुक्यात याआधी देखील अनेकांना न्यूड कॉल करून गंडविण्याचा प्रयत्न झाले आहेत. दरम्यान, आता थेट मोबाईलमधील कॉन्टॅक लिस्ट हॅक करून ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
















