सांगली (वृत्तसंस्था) नुकत्याच सुरू झालेल्या तलाठी परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला महसूलच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. शहरातील व्हीपी इन्स्टिट्यूट येथे हा प्रकार घडला.
गणेश रतन नागलोत (वय २३, रा. लांडकवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एक मोबाईल, एक सपोर्टर, हेडफोन, लहान डबीतील इलेक्ट्रीक डिव्हाईस असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत नायब तहसीलदार आशिष लक्ष्मण सानप यांनी फिर्याद दिली. तलाठी भरतीची परीक्षा सध्या घेण्यात येत आहे. सांगलीतील मिरज रस्त्यावरील व्हीपी इन्स्टिट्यूट येथे परीक्षा घेण्यात येत आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षार्थीची तपासणी करण्यात येत होती. यावेळी नागलोत याने परीक्षागृहाच्या आवारात बॅग ठेवली होती. संशय आल्याने सदर बॅगची तपासणी करण्यात आली. या वेळी त्यात मोबाईल, हेडफोन, प्लास्टिक डबीत डिव्हाईस, दोन सेल, तीन सिमकार्ड असे साहित्य मिळाले. याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्यास विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.
वनविभागाच्या परीक्षेतही केली होती कॉपी !
वनविभागाच्या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. संशयित नागलोत याने यापूर्वी वनविभागाच्या परीक्षेत कॉपी केल्याने त्याच्यावर शिरोली पोलिसांनी कारवाई केल्याचे तपासात पुढे आले आहे. नागलोत याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्यावर वनविभागाच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी शिरोली पोलिसात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.