चोपडा (प्रतिनिधी) चोपडा सूतगिरणी आवारात घटस्थापनेच्या मध्यरात्री गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न प्रसंगावधानामुळे फसल्याची तक्रार भरत बाविस्कर व सुकलाल कोळी यांनी चोपडा पोलीसात दिली आहे. दरम्यान, नवरात्रीच्या काळात काळाजादूचा प्रकार घडल्याची तक्रार पोलिसात दिल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडगाव सिम ता. चोपडा येथील भरत विठ्ठल बाविस्कर व चौगाव येथील सुकालाल दंगल कोळी हे दोघे जण कामानिमित्ताने १७ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे गेले होते. काम आटोपून साधारण १० ते १२ च्या दरम्यान, धरणगावमार्गे चोपडा येत असताना सूतगिरणी जवळून जात असताना “मला वाचवा”, मला वाचवा” असा मोठं मोठ्याने आवाज देत एक इसम पळताना व त्याच्या मागे ५ ते ६ जण त्याला पकडण्यासाठी धावताना दिसले.
प्रथम दर्शनी चोरीचा प्रकार असावा म्हणून ती माणसं त्या चोराला पकडण्यासाठी पळत असावी असे बाविस्कर व कोळी यांना वाटले. म्हणून खरी हकीकत जाणून घेण्यासाठी दोघेही गेट जवळ गेले असता तेवढ्यात तो पळणारा अनोळखी इसम कंपाऊंड कुदून बाहेर पडला. त्याला पकडण्यासाठी धावणाऱ्या त्या ५ ते ६ जणांनी गेट उघडून त्याचा मागे धाव घेतली. हा प्रकार नेमका काय आहे. म्हणून जाणून घेण्यासाठी बाविस्कर व कोळी यांनी गेटवर जमलेल्या कर्मचारींना विचारले असता नरबळी देण्याचा भयानक प्रकार ऐकावायास मिळाला.
शहाद्याकडील एका आदिवासी इसमाचा गुप्तधन काढण्यासाठी त्याचा नरबळी देण्याचा घाट सूतगिरणीचे कर्मचारी प्रफुल पवार, गोरगवले येथील मनोहर पाटील, धुमावल येथील दीपक पाटील व त्यांचे सहकारी यांचा होता. पूजा व साहित्याची मांडणी करून तापीच्या पाण्याने त्याची आंघोळ करून सूतगिरणीचे सेकंड फेज बांधकामाकडे घेवून गेले. त्या ठिकाणीं निंबु, अंडी, अगरबत्ती, मिरची, गुलाल, भिलावे, नवी चादर, सुई असे साहित्य पाहिल्यावर सदर इसमाच्या लक्षात आले की, या ठिकाणीं आपला बळी देवून धन काढण्याचा ह्या लोकांचा प्रयत्न दिसतो. म्हणून त्याने प्रसंगावधान राखून प्रफुल्ल पवार नामक व्यक्तीच्या हाताला चावा घेऊन धूम ठोकली. त्सुयामुळे दैवाने पुढील अनर्थ टळला, अशी महिती तेथे उपस्थित असलेल्या कर्मचारींनी भित-भित दिल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित इसमाचा बळी गेला नाही किंवा गुप्तधन निघाले नाही. परंतू गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळ सूतगिरणी असल्यामुळे यात शासनाची देखील फसवणूक झाल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे.
सदरचा प्रकार अतिशय गंभीर असल्याने अशा निष्ठुर, निर्दयी, लोभी व्यक्तीचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून बाविस्कर व कोळी यांनी चोपडा पोलीसात तक्रार दिली असून पोलिस अधीक्षक मुंढे यांचीही भेट घेऊन सदरचा प्रकार त्यांच्या लक्षात आणून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.