मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहेत. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रकार सहन केला जाऊ शकत नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहेत. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेसृष्टी हा एक मोठा मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात, असे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी बॉलीवूडच्या बदनामी षडयंत्र रचणाऱ्यांना फैलावर घेतले. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रकार सहन केला जाऊ शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितले आहे. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्जचे प्रकरण समोर आले. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडच्या पहिल्या फळीतील कलावंत, निर्माते आणि दिग्दर्शकांना लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे.
















