पुणे (वृत्तसंस्था) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) आणखी चार कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातील सरकारी जागेवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही जमीन पुण्यातील गणेशखिंड रोडवरील रेंज हिल कॉर्नरमधील प्लॉन नंबर २, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत स्थित आहे. यापूर्वी परकिय चलन गैरव्यवहार प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अविनाश भोसलेंना ईडीने याआधी समन्स बजावले होते. त्यानंतर त्यांची ही चार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी ईडीने अविनाश भोसले आणि कुटुंबातील काही सदस्यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुण्यातील घरी छापेमारी देखील करण्यात आली होती. त्यानंतर भोसले यांच्या पुणे, नागपूर आणि गोवा येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या. विदेशी विनियम व्यवस्थापन कायदा 1999 (फेमा) कलम उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.