दुमका (वृत्तसंस्था) झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयंकर आणि चीड आणणारी घटना घडली आहे. गावातील जत्रेहून पतीसोबत परत येणाऱ्या महिलेवर १७ जणांनी बलात्कार केला.
पतीसमोर महिलेवर १७ जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला पतीसोबत बाजारातून परतत असताना हा प्रकार घडला. झारखंडमधील डुमका येथे ही घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून इतर १६ जण फरार आहेत. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून, त्याचा तपास करत आहोत, असे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत बुधवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच, डीआयजी आणि पोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह मुफस्सिल पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. पीडितेच्या जबाबाच्या आधारे तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.पीडित महिला पाच मुलांची आई आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पतीसोबत आपण बाजारातून परतत असताना सर्व १७ आरोपी तिथे हजर होते. त्यांनी आम्हाला थांबवलं. ते सर्व दारुच्या नशेत आहेत. त्यांनी माझं अपहरण केलं आणि ओढत जवळच्या झाडीत नेलं. यावेळी इतरांनी पतीला धरुन ठेवलं होतं. यानंतर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला”.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दुमकातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर मंगळवारी बाजार भरतो. बाजारहाटीसाठी महिला पतीसोबत गेली होती. त्याच गावात जत्रा भरली होती. रात्री उशिरा जत्रेतून ती पतीसोबत घरी परतत होती. त्याचवेळी काही गुंडांनी पतीला धरून ठेवले आणि महिलेवर सामूहिक बलात्कार केला. बुधवारी सकाळी पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.