हैदराबाद (वृत्तसंस्था) वनस्थलीपुरममधील सहारा कॉलनीतील रहिवाशांना भटक्या कुत्र्यानं जबड्यात बाळाचं डोकं पळवून नेत असल्याचं निदर्शनास आलं, हे पाहून त्यांना धक्का बसलाय. वनस्थलीपुरम पोलिसांनी (police) सांगितलं की, सध्या बाळाचं डोकं ताब्यात घेतलं असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलंय. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल (रविवार) मन्सूराबाद येथील एका दूध बुथवर असलेल्या कार्तिकला भटक्या कुत्र्याच्या जबड्यात मानवी डोकं आढळून आलं. त्यानं इतर काहींना घेऊन कुत्र्याचा पाठलाग केला असता, ते डोकं कुत्र्याच्या तोंडातून झुडपात पडलं. याबाबत त्यांनी पोलिसांनी त्वरित माहिती कळवली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, हे डोकं दोन-तीन दिवसांच्या बाळाचं असल्याचं आढळून आलं. मात्र, या बाळाचं धड अद्याप सापडलेला नाहीय. मुलाच्या पालकांनी मृतदेह योग्यरित्या पुरला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. या भटक्या कुत्र्यांनी बाळाचे लचके तोडून डोकं धडा वेगळं केलं असावं, असाही संशय व्यक्त केला जातोय. परंतु, खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तपास केला जात आहे, असंही वनस्थलीपुरम पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यानं सांगितलंय. कुत्र्याला बाळाचं डोकं कोठून सापडलं याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, असंही ते म्हणाले.