बीड (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विकासकामांच्या श्रेयवादावरुन प्रितम मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना उद्देशून ‘आयत्या बिळात नागोबा’, असा उल्लेख केला आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुंडे भगिनी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरुन आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रितम मुंडे यांनी पुन्हा एकदा विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेऊ नये, असे खडेबोल सुनावले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आयत्या बिळात नागोबा, अशी व्यवस्था झाली आहे”, अशी घणाघाती टीका प्रितम मुंडे यांनी केली. “पंकजा मुंडे पालकमंत्री असतानाही सगळी काम मंजूर झाले आहेत. कोणी कितीही नारळ फोडा, जनता हुशार आहे”, असा टोला प्रितम मुंडे यांनी लगावला.
आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांच्या भूमिपूजनाचे नारळ कोणाला फोडायचे ते फोडू द्या. बीड जिल्ह्यात सध्या घर एक जण बांधतोय आणि त्या घराची वास्तुशांती दुसराच कोणीतरी करतोय. त्यामुळे आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादींच्या लोकांनी करू नये. सध्या राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा होऊन बसण्याचं काम करत आहे”, अशी टीका प्रीतम मुंडे यांनी केली.