जबलपूर (वृत्तसंस्था) शिर्डीच्या साईबाबांबद्दल बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला असून धिरेंद्र शास्त्रीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
एका कार्यक्रमात शास्त्री यांना सवाल करण्यात आला की, साई बाबांची पूजा करावी की करू नये? यावर शास्त्री म्हणाले, गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.) यावेळी शास्त्री यांनी साई बाबांना ईश्वर मानन्यास नकार दिला. तसेच हिंधू धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्य यांचे मत मानणे अनिवार्य आहे. त्यांच्या मताचे पालन करणे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कारण शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचे स्थान देता येणार नाही.
बागेश्वर बाबा पुढे म्हणाले, संताची पूजा करायची तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का? तुलसीदास, सूरदास किंवा इतर कोणतेही संत असोत ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. त्याचप्रमाणे साईबाबा हे संत असू शकतात, फकिर असू शकतात. दरम्यान, शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांविषयी नेहमीच अशी वक्तव्ये करत असतात. साईबाबा देव आहेत की नाही? यासाठी धीरेंद्र शास्त्रीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. धिरेंद्र शास्त्रींनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे त्यांची अक्कल ठिकाणावर येईल; अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्यात.