टोकयो (वृत्तसंस्था) हिंदुस्थानचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ६५ किलो वजनी गटामध्ये कांस्यपदक जिंकले आहे. शनिवारी झालेल्या लढतीत बजरंगने कझाकीस्तानच्या दौलत नियाजबेकोव याचा ८-० असा दणदणीत पराभव करत कांस्यपदकावर विजयी मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे कुस्तीतील हे दुसरे तर एकूण सहावे पदक आहे.
६५ किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियाचा यापूर्वी अझरबैजानाच्या हाजी अलियेव्हनं १२-५ ने पराभव केला होता. बजरंगनं क्वार्टरफायनलध्ये कझाकस्तानच्या इराणच्या मूर्तझा चेकाचा संघर्षपूर्ण लढतीमध्ये पराभव केला होता. त्या मॅचमध्ये बजरंगनं शेवटच्या काही सेकंदामध्ये बाजी फिरवली. प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.
मूर्तझानं पहिल्यांदाच बजरंगचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बजरंगनं मोठ्या कौशल्यानं त्यातून सुटका केली. बजरंगनं सुरुवातीला बचाव करण्यावर भर दिला. पहिल्या राऊंडनंतर इराणच्या कुस्तीपटूकडं एक पॉईंटची निसटती आघाडी होती. दुसऱ्या राऊंडमध्ये दोघांनी आक्रमक खेळ केला. बजरंगची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे. मात्र त्यानं यापूर्वी कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.
यापूर्वी भारताच्या रवी कुमार दहियानं सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. तर दीपक पुनियाचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. भारताच्या अन्य कुस्तीपटूंनाही मेडल मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे शनिवारी सर्व आशा बजरंगवर होत्या. बजरंगनं या अपेक्षांची पूर्ती करत ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे.