मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं, अशी टीका साध्वी कांचन गिरी यांनी केली आहे. तसेच पालघरमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केले होते,” असा आरोप कांचन गिरी यांनी केला.
साध्वी कांचन गिरी मुंबईत आल्या आहेत. काल त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राज ठाकरेंची स्तुती करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरेंबाबत मला काही बोलायचं नाही. त्यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे, असं कांचन गिरी म्हणाल्या. उद्धव ठाकरेंवर मी नाराज आहे. त्यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे, असं सांगतानाच पालघरमध्ये हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले कान आणि डोळे बंद केले होते, असी टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरेंचे कौतुक
कांचन गिरी यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं. “राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प राज ठाकरे पूर्ण करतील. राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीयांबाबत जो पूर्वग्रह झालाय तो मी दूर करेल. ते समजुतदार आहेत त्यामुळे ते हे समजून घेतील,” असंही कांचन गिरी यांनी नमूद केलं.