जळगाव (प्रतिनिधी) बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांची महती लहान मुलांमुलींपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव राबविण्यात येत आहे. जळगाव शहरात या महोत्सवाचा शुभारंभ आज (दि. २१) रोजी बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते जल्लोषात करण्यात आला.
महाबळ रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झालेल्या या महोत्सवाच्या सुरुवातीला काव्य रत्नावली चौकातून लोककलेची दिंडी काढण्यात आली. यात नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयातील ९० विद्यार्थिंनी तसेच गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिरातील ६० विद्यार्थ्यांनी आपल्या लेझीम व ढोल पथकासह सहभाग घेतला.
लोककलेची दिंडी कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर सुरु झालेल्या उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलम शिर्के सामंत, ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील, मुंबई शाखेचे कोषाध्यक्ष आसेफ अन्सारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगावच्या कोषाध्यक्ष प्रा.शमा सराफ, स्पर्धेचे परीक्षक प्रा.सुचित्रा लोंढे, अजय शिंदे, धनश्री जोशी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे आदी उपस्थित होते. नटराजपूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित बालप्रेक्षकांशी संवाद साधतांना निलम शिर्के सामंत म्हणाल्या की, आजच्या युगात कोरोना कालावधी मोबाईलच्या जवळ गेलेल्या बालकांना आपल्या संस्कृती व संस्कारांचे महत्व सांगण्याचे काम बालरंगभूमी परिषद करत आहे. विविध महोत्सवांच्या माध्यमातून आपले महाराष्ट्र राज्य वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण लोककलांनी समृध्द राज्य आहे. या कला विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात हा उद्देश घेऊन जल्लोष लोककलेचा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी, शिक्षकांनी मुलांपर्यंत पोहचवलेला हा महोत्सव यंदाच नाही तर दरवर्षी आयोजित केला जाणार असून, जळगावातील मुलांमुलींच्या भरभरुन आलेल्या प्रवेशिकांचा आनंदही झाला आहे. जळगावातील महोत्सवात आजच्या एकल सादरीकरणामध्ये राज्यातील महोत्सवांमधील सर्वाधिक वाद्यवादनाच्या २५ प्रवेशिका आल्या याचे कौतुक जास्त आहे. तसेच गीत गायनात १८ व एकल नृत्याच्या ३० प्रवेशिका हे देखील आशादायक चित्र आहे. मुलामुलींना लोककलांविषयी आवड निर्माण होते आहे. यातच आमच्या महोत्सवाचे सार्थक आहे.
आज समूह गायन व नृत्याचे सादरीकरण
जल्लोष लोककलेचा या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात समूह गायन व समूह नृत्याचे सादरीकरण होणार आहे. या महोत्सवात २८ विद्यालयांनी सहभाग घेतला असून, सकाळी ९ वाजेपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, स्पर्धा संपल्यानंतर लगेचच या महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या बालकलावंताकरिता ७५ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाच्या जळगाव येथील आयोजनात भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अनमोल सहकार्य बालरंगभूमी परिषदेस लाभत आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.
लोककलेच्या दिंडीत निलम शिर्के यांनी धरला ताल !
लोककलेची दिंडीतील सहभागी विद्यार्थी – विद्यार्थिंनीसह ढोल ताशाच्या तालावर ताल धरत बालरंगभूमी परिषदेच्या अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांनी लेझीम नृत्याचा आनंद घेतला.