गाझियाबाद (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका ५ वर्षांच्या मुलीमध्ये मंकीपॉक्सची (Monkey Pox) लक्षणे आढळून आली आहेत. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
गाझियाबादचे सीएमओंनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीला इतर कोणताही त्रास नाही. ती किंवा तिचा कोणताही नातेवाईक गेल्या महिनाभरात विदेशात गेलेला नाही किंवा विदेशातून घरी परतला नाही. सीएमओंच्या माहितीनुसार, मुलीचे काही नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. पुढील २४ तासांत तपासणीचा अहवाल येणार आहे. मुलीला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या मुलीमध्ये आढळून आलेली लक्षणे इतर आजाराचीही असू शकतात, असेही सीएमओंनी सांगितले. मात्र, खबरदारी घेतली जात आहे. त्यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे.
मंकीपॉक्सची लक्षणे
मंकीपॉक्स हा दुर्मिळ आजार आहे. फ्लू सारखी त्याची सुरुवातीची लक्षणे असतात. त्यात ताप येणे, डोकेदुखी, थंडी, मांसपेशींमध्ये वेदना, कंबरदुखी, थकवा आदी लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर चेहऱ्यावर फोड्या येण्यास सुरुवात होते. त्या शरीरावरील इतर भागांवरही पसरतात. ही लक्षणे संसर्गानंतर पाच दिवसांपासून २१ दिवसांपर्यंत आढळून येतात.