जळगाव (प्रतिनिधी) एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारून त्याच्या वायर तोडून एटीएममधील तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव तालुक्यातील जळके येथे घडली.
तालुक्यातील जळके येथील बसस्थानक परिसरात एटीएम आहे. याठिकाणी असलेल्या एटीएम केंद्रामध्ये रविवारी दि. १० डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून त्याच्या वायर तोडल्या. त्यानंतर एटीएममधील २४ हजार रुपये किमतीच्या एकूण तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक दौलत तिवारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील करीत आहेत.