मुंबई (वृत्तसंस्था) जागतिक आरोग्य संघटनेने एका गंभीर गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले असून यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. भारत आणि युगांडामध्ये चक्क कोविशिल्डचे बनावट डोस आढळून आले आहेत. स्वत: सिरम इन्स्टिट्युटने याला दुजोरा दिला आहे.
भारतात लस पुरवठा व वितरणाचे व्यवस्थापन करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडूनच लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्यांना केंद्र सरकारकडून लशींचा पुरवठा केला जातो. त्यानंतरही WHO जागतिक देखरेख आणि नियंत्रण यंत्रणेला भारतासह युगांडामध्ये कोविशिल्ड लशीचे बनावट डोस आढळून आले आहेत. त्यानंतर मंगळवारी दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिकेत अलर्ट जारी करण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेनं यासंदर्भातील माहिती आपल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून दिली आहे. भारतामध्ये कोविशिल्ड लसीच्या ‘२ एमएल’च्या वायल्स आढळून आल्या आहेत. पण कोविशिल्डची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटकडून २ एमएलच्या वायल्स तयारच केल्याच जात नाहीत. सिरम इन्स्टिट्युटनंही याला दुजोरा दिला आहे. युगांडामध्येही १० ऑगस्टला एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच आढळून आली होती. त्यामुळे डब्ल्यूएचओने यासंदर्भात अधिक जागरुक राहण्याचं आवाहन केलं आहे.
‘बनावट लसी जागतिक आरोग्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत असून कोरोना होण्याची शक्यता अधिक असलेल्या नागरिकांसाठी गंभीर ठरू शकतात. या बनावट लसी तातडीने शोधून काढून हटवणे हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे, असं WHO ने म्हटलं आहे. तसंच, बनावट लसींचा धोका लक्षात घेता डब्ल्यूएचओने सर्व हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, आरोग्य केंद्रे, वितरक, फार्मसी आणि वितरणाच्या इतर सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, भारतात लस वितरणाची यंत्रणा अत्यंत पारदर्शक असल्यानं अशा गोष्टी होणार नाही. मात्र, हा प्रकार समोर आल्यानं याबाबत तपासणी केली जाईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.