जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाझर तलावामधून कोट्यवधी रुपयांच्या दुय्यम गौण खनिजांच्या पावत्या येत आहेत आणि अधिकाऱ्यांनी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सरकारी अधिकारी दुय्यम खनिजांवर ताशेरे ओढत असल्याचा पुरावा जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार जिल्ह्यात झाला असून यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येणार आहे.
पल्लवी सावकारे पुढे म्हणाल्या की, प्रामुख्याने जळगाव, भडगाव, पाचोरा अशा तालुक्यांत गौण खनिजविषयी मिळालेल्या कागदपत्रात प्रचंड घोळ दिसत आहे. एकच चालक एकच वेळेला विविध क्रमांकाचे ट्रॅक्टर घेऊन अनेक ठिकाणी वाळू वाहतूक करतो असे गमतीशीर प्रकरण देखील यात दिसून आले आहे. तसेच दुचाकी, तीनचाकी वाहनांना वाळू वाहतुकीसाठी दिलेल्या परवान्याबाबतही पल्लवी सावकारे यांनी शंका व्यक्त केली आहे. तथापि अनेक वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरवर असणारी क्रमांक आरटीओ कार्यालयाकडे नोंदच नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अनेक तालुक्यांमध्ये बोगस पावत्या तयार करून गौण खनिजांची लूटमार जिल्ह्यात सुरू आहे. तसेच पाचोरा तहसीलदार यांच्या नावाचे बोगस शिक्का बनवला असून तहसीलदार यांच्या नावाने बोगस सह्या कागदपत्रांवर आहेत. त्यामुळे देशद्रोहाचा देखील गुन्हा नोंद करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी केली आहे.