पुणे (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार, पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम ठरलेला होता. त्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनासाठी स्मृती इराणी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पोहोचल्या. यावेळी तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत घोषणाबाजीला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले.
या दरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेत तेथून बाहेर नेत होते. मात्र, त्याच दरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहे. या प्रकरणात आता भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याआधी स्मृती इराणी जे मेरेटियल हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमधून कार्यक्रमस्थळी निघाल्या असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. स्मृती इराणी यांना बाहेर येता आले नव्हते. पोलिसांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर त्या बालगंधर्व कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या.