नागपूर (वृत्तसंस्था) एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीत अतिविश्वास ठेवणे महागात पडले. आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व लग्नासाठी विचारल्यावर बेल्टने मारहाण करत अगदी सिगारेटचे चटके देत तिचा छळ केला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा असून मात्र आरोपी अद्यापही फरार आहे.
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रशांत परिहार (वय २३, कुंभारटोली, नंदनवन) याच्याशी ओळख झाली. एप्रिल २०२० मध्ये ही ओळख झाली व काही दिवसांतच त्यांच्यात मैत्री झाली. प्रशांतने तिच्यावर प्रेम असल्याचे नाटक केले. प्रशांतने तिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याच वेळी पीडिताही त्याच्या जाळ्यात आली. यानंतर आरोपी पीडितेच्या घरीही जाऊ लागला.
या दरम्यान त्याने तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. एकेदिवशी आरोपीने पीडितेचे इतर तरुणांशी संबंध असल्याचा आरोप करत वाद घातला. या दरम्यान आरोपीने पीडितेला बेल्टने मारहाण केली आणि सिगारेट ओढून त्याचे तिला चटके देत जीवे मारण्याची धमकी दिली. २५ एप्रिलपर्यंत असाच प्रकार सुरू होता. यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.