जालना (वृत्तसंस्था) घराच्या अंगणात झोपलेल्या तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना जालना शहरातील सारवाडी रोडवरील टीव्ही सेंटर भागात शनिवारी मध्यरात्री घडली. प्रमोद जनार्दन झिने ( ३९ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार !
प्रमोद झिने हे एका कंत्राटदाराकडे चालक म्हणून काम करीत होते. शनिवारी रात्री जेवण करून नेहमी प्रमाणे घरासमोर असलेल्या पलंगावर प्रमोद तर इतर सदस्य घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी प्रमोद यांच्या डोक्यावर, मानेवर, शरीरावर इतर ठिकाणी धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेहावर चादर टाकून तेथून मारेकरी फरार झालेत. लग्नाला जायचे असून सकाळी सहा वाजेपर्यंत प्रमोद हे झोपेतून उठले नाहीत. त्यामुळे पत्नी, वडिलांनी त्यांना आवाज दिला. तरीही ते उठले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी चादर ओढून पाहिले असता प्रमोद हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेने भेदरलेल्या नातेवाईकांनी लागलीच पोलिसांना फोन करून हकीगत सांगितली.
बकऱ्या, गाय चोरीस जाऊ नये म्हणून प्रमोद रोज घराबाहेर झोपायचा !
प्रमोद यांच्याकडे आठ शेळ्या, गाय आहेत. त्या चोरीस जाऊ नये, म्हणून प्रमोद हे रोजच घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपत होते. त्यांच्याजवळ एक पाळीव कुत्रा असायचा, परंतु हा कुत्रा भुंकू नये म्हणून आरोपींनी त्याला काहीतरी टाकले अन् कुत्रा गुंगीत एकाच ठिकाणी झोपून होता. या वेळेतच आरोपींनी वार केले असावे, असा संशय मृताच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.
सकाळीच जायचे होते नातेवाइकांच्या लग्नाला !
मृत प्रमोद हा त्यांच्या कुटुंबीयांसह मंठ्याकडे नातेवाइकाच्या मुलीच्या लग्नाला जाणार होते. परंतू, रात्रीच प्रमोद यांचा घात झाला. त्यामुळे लग्नाला जाण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. दरम्यान, मारेकरी हल्ला करत होते तेव्हा प्रमोद किंचाळला का नाही?, किंचाळला असेल तर घरात आवाज का आला नाही?, या अनुषंगाने पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली असल्याचे कळते.