मुंबई (वृत्तसंस्था) येत्या १ फेब्रुवारी पासून तमाशाच्या फडांना मुभा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना तसं आश्वासन मिळालेलं आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकरांनी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे
आज सकाळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फर रिलीफ फंडातून तमाशा कलावंतासाठी एक कोटी आर्थिक मदत देण्याचे शरद पवार यांनी घोषणा केली आहे. तसेच तमाशाला सुरू करण्याची परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तमाशा सुरू करण्यास अडचण नाही, असे म्हटले आहे. या आश्वसनानंतर सामूहिक आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली. राज्यात तमाशा सुरु करण्यास परवानगी मिळावी यासाठी राज्यातील तमाशा कलावतांनी अजित पवारांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आता या आश्वसनानंतर सामूहिक आत्मदहन आंदोलन ही स्थगित करण्यात आलं आहे.
















