मुंबई (वृत्तसंस्था) प्रियकराने व्हॉट्सअॅपवर प्रेयसीचा नंबर ब्लाॅक केल्याने एका तरुणीने मुंबईतील बोरीवली (Mumbai Crime) रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या तिच्या प्रियकराच्या घरी गळफास लावून घेतला. प्रणाली लोकरे असे या आत्महत्या केलेल्या तरुणींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली आणि तिचा 27 वर्षीय प्रियकर गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रविवारी रात्री दोघेही कोणाच्या तरी लग्नात गेले होते, त्यानंतर प्रणालीने तिच्या प्रियकरासोबत रात्री त्याच्या घरी राहायचे आहे, असा आग्रह धरला. मात्र, त्याने तिची मागणी मान्य न करता तिला घरी जाण्यास सांगितले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर प्रणाली आपल्या घरी निघून गेली. मात्र घरी गेल्यानंतरही तिने तिच्या प्रियकराला वारंवार कॉल करून मला तुझ्या घरी यायचं आहे असा आग्रह धरला.
वारंवार विनंती केल्यानंतरही प्रणाली ऐकत नसल्याने तिच्या प्रियकराने तिचा नंबर ब्लॉक केला. मध्यरात्रीच्या सुमारास प्रणाली पुन्हा प्रियकराच्या घरी गेली. आणि व्हॉट्स अॅपवर तिचा नंबर ब्लॉक करण्याबद्दल त्याला विचारपूस केली. त्यानंतर प्रियकराने तिला शांत केले आणि तो झोपी गेला. दरम्यान, सकाळी तिच्या प्रियकराला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला प्रणाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती प्रियकराने तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, प्रणालीने खरचं गळफास घेतला आहे का याची चौकशी पोलीस करीत आहेत.