वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तालिबान्यांना गंभीर इशारा दिला आहे. आमच्या फौजा किंवा काबूल विमानतळावर सुरू असलेलं बचावकार्य यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केलात, तर त्याला तितक्यात तीव्रतेनं आणि सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं बायडेन यांनी इशारा दिला आहे.
व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या सुरू असलेल्या मदतकार्याविषयी चिंता व्यक्त केली. “हे इतिहासातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात कठीण अशा एअरलिफ्टपैकी एक आहे. याचा शेवट काय होईल, हे मी आत्ताच सांगू शकणार नाही”, असं जो बायडेन म्हणाले आहेत. १४ ऑगस्टपासून आत्तापर्यंत काबूल विमानतळावरून १३ हजार नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आलं असून अजूनही ही संख्या वाढत आहे. अफगाणिस्तानमध्ये नक्की किती अमेरिकी नागरिक राहात आहेत, हे २० वर्षांच्या युद्धानंतर देखील अमेरिकेला माहिती नव्हतं, असं देखील बायडेन यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये बायडेन यांनी तालिबान्यांना कठोर इशारा दिला आहे. “आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्या फौजा किंवा काबूल विमानतळावर सुरू असलेलं बचावकार्य यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केलात, तर त्याला तितक्यात तीव्रतेनं आणि सडेतोड उत्तर दिलं जाईल”, असं बायडेन म्हणाले.