नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. ‘ओमिक्रॉन’ (omicron) संसर्ग मागील सर्व अवतारांना मागे टाकत आहे. अलीकडेच समोर आलेल्या काही आकडेवारीवरून या गोष्टी स्पष्ट होत आहेत. दरम्यान अहवालानुसार कोरोना संसर्गाचा सध्याचा दर असाच राहिला तर सात दिवसांत दैनंदिन रुग्णांची संख्या दुप्पट होऊन ३६ हजारांवर जाऊ शकते.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, रविवारी भारतात ३३ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळले. हा आकडा १७ सप्टेंबर किंवा १०७ दिवसांनंतर एका दिवसात सर्वाधिक आहे. २ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात कोविडची सरासरी १८ हजार २९० नवीन प्रकरणे दररोज नोंदवली गेली. एचटी डेटानुसार, १२ ऑक्टोबरपासून सात दिवसांची ही सर्वाधिक सरासरी आहे.
आकडेवारीचा विचार करता गेल्या अडीच महिन्यांतील प्रकरणांचा हा सर्वात वाईट दर आहे. त्याचवेळी ते ज्या वेगाने वाढत आहे, तेही चिंताजनक आहे. २५ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात सात दिवसांची राष्ट्रीय सरासरी ६ हजार ६४१ होती. या अर्थाने, नवीन संसर्गाचा दर केवळ एका आठवड्यात १७५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ९ एप्रिल २०२० नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ आहे. दुसर्या लाटेतही ही आकडेवारी ७५ टक्क्यांनी वाढली. अहवालानुसार, कोरोना संसर्गाचा सध्याचा दर असाच राहिला तर सात दिवसांत दैनंदिन रुग्णांची संख्या दुप्पट होऊन ३६ हजारांवर जाऊ शकते. रविवारी दिल्लीत ३ हजार १९४ नवीन रुग्ण आढळून आलेत आणि सात दिवसांची सरासरी १५३८ झाली.
आठवडाभरापूर्वीच्या तुलनेत येथील संख्या ८३२ टक्क्यांनी वाढली. त्याचप्रमाणे रविवारी मुंबईत ८ हजार ६३ नवीन रुग्ण आढळून आल्याने दररोज येणाऱ्या रुग्णांची सरासरी वाढून ३ हजार ९९४ झाली आहे. येथे ६२४ टक्के वाढ दिसून आली. भारतातील सध्याचा ट्रेंड दैनंदिन प्रकरणांचा दर मागील लहरींपेक्षा वेगाने वाढत असल्याचे दर्शवतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे. संघटनेने १९ डिसेंबर रोजी सांगितले की, ओमिक्रॉन डेल्टापेक्षा वेगाने पसरत आहे. डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले, ‘कोविड-१९ मधून लसीकरण झालेल्या किंवा बरे झालेल्या लोकांना संसर्ग होण्याची किंवा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.