भडगाव (प्रतिनिधी) येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंगळवारी अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शाळेच्या संरक्षण भिंतीचे कवच नसल्याने नाल्यात पडल्याने नर्सरीमध्ये शिकणाऱ्या दोन निष्पाप बालकांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून, शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये मधल्या सुट्टीच्या वेळी अर्थात सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मुले डबा खात असताना ही दुर्दैवी घटना घडली. नर्सरीच्या वर्गात जवळपास १७० विद्यार्थी असताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ एकच के अर-टेकर उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने) हे दोन बालक डबा खाण्याच्या वेळी वर्गात दिसले नाहीत. शिक्षकांनी शोध घेतला असता, शाळेच्या मागील बाजूस असलेल्या कोल्हा नाल्यात हे दोन्ही बालक पडलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
शाळेत घडलेल्या घटनेची माहिती दोन्ही बालकांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी शाळा, ग्रामीण रुगणालयात धाव घेत हंबरडा फोडला. तर घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी शाळा व रुग्णालयात मोठी गर्दी केली. तर, संस्थाचालक आणि जबाबदार शिक्षकांना आमच्या ताब्यात द्या, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली. या वेळी एका नातेवाईकाने सोबत आणलेली पेट्रोलची बाटली दाखवत न्याय मिळाला नाही तर पेटवून घेईन, असा इशारा दिल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली.
शहरात चक्का जाम अन् पोलीस ठाण्यात गर्दी
या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नसल्याने संतप्त नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे १ तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे चाळीसगाव, पाचोरा आणि पारोळा रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृत बालकाचे नातेवाईक, पालक, नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली, त्यामुळे पोलीस स्टेशन परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. निष्पाप दोघांचे जीव केवळ शाळा व्यस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे गमावल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी शाळांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना सक्तीने राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.
















