मुंबई वृत्त संस्था | शिवसेनेला बहुमत चाचणीच्या आधी आणखी एक मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले आहेत. संतोष बांगर हे काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी काल शिवसेनेच्या बाजून मतदान सुद्धा केलं होतं.
मात्र आज त्यांनी बदलेल्या भूमिकेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. संतोष बांगर आज ताज प्रेसिडन्सीमध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळाले. संतोष बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्यानंतर संतोष बांगर हे शिंदे गटातील आमदारांसोबत बस मधून विधानभवनात रवाना झाले आहे. संतोष बांगर यांच्या बंडखोरीमुळे आता शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. तर शिवसेने सोबतच्या आमदारांची संख्या आता 15 वर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार ज्यावेळी गुवाहाटी येथे पोहोचले होते, तेव्हा आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक दिसले होते. त्यांनी या बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन देखील केले होते. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी दाखवलं होतं.मात्र ते अचानक शिंदे गटात सामील झाल्याने आणखी किती आमदार शिंदे गटात सामील होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
















