भंडारा (वृत्तसंस्था) भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याच्या घटनेत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पीडितांना १० लाखांची मदत जाहीर करा अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.
भंडारा अग्नीतांडवप्रकरणी हलगर्जीपणा झाला आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भंडाऱ्यात पोहोचले होते. जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. प्रगतीशील महाराष्ट्रात १० नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, फायर ऑडिट का झाले नाही याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आम्हाला यात कोणतेही राजकारण करायचे नाही. पण, सरकारकडून जे दावे केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. हे यातून स्पष्ट दिसत आहे, असा आरोपही फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार केला. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख ऐवजी १० लाखाची मदत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भंडारा जिल्हा रुग्णालयातल्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेत्यांनी ट्विटद्वारे दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. यावेळी ७ बालकांना वाचवण्यात यश आलं आहे.