औरंगाबाद (वृत्तसंस्था) एकीकडे राज्यात सत्ता संघर्ष टोकाला गेलेला असतांना दुसरीकडे मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांचा ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर भन्नाट डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या राज्यात मोठा सत्तासंघर्ष सुरू असून शिवसेनेचे अनेक आमदार सध्या बंड पुकारून एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे शिवसेना मोठ्या संघर्षातून जात असून राज्याच्या राजकारणात सध्या तणावाचं वातावरण आहे. अशात आता शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे. उदयसिंग राजपूत यांनी रविवारी एका लग्न समारंभात डीजेवर मै हू डॉन या गाण्यावर ठेका धरला. एकीकडे राज्यात सत्ता नाट्य चालू असताना दुसरीकडे शिवसेना आमदाराने भन्नाट डान्स केला आहे. त्यामुळे या डान्सची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला शिंदे गटात सहभागी होण्यासाठी ५० कोटीची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती.