कोल्हापूर (वृत्तसंस्था) राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्षपूर्ण झाले असून यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. मुख्यमंत्र्यांनी यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर शिवसेनेवर भाजपनेही पलटवार केला. भारतीय जनता पार्टी एकटी सर्वाना पुरून उरल्यामुळेच त्यांचा थयथयाट अपेक्षित असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, जो समर्थ माणूस असतो, त्याचे शत्रू जास्त असतात. भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरल्यामुळेच त्यांचा थयथयाट अपेक्षित आहे. वेगवेगळी विधाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच करुन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात. पण, राऊतच मुख्यमंत्र्यांना जास्त प्रिय असल्याचा टोलाही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
पाटील पुढे म्हणाले की, सर्वसामान्य हिंदू जाणतो की या 1925 साली देशातील हिंदूंचे रक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर झाले. ज्या प्रकारे हिंदू संघाने संघटित केला, हिंदू समाजाचे त्यातून रक्षण झाले, त्यातून हिंदू एकत्रित झाले, ताकद निर्माण झाली आणि त्यांनतर वेगवेगळ्या प्रकारचे जातीय दंगे संपले. हिंदुत्व कोणाचे बेगडी आणि कोणाचे दलालांच आहे, हे सर्वसामान्य हिंदूला जाऊन विचारा, असा हल्लाबोलही पाटलांनी केला.