नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या कचाट्यात सापडलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
काही दिवसांपूर्वीच भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्या शिवसेनेच्या इतर १२ आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या होत्या. गेल्या अडीच वर्षांच्या काळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भावना गवळी यांच्यापाठी ‘ईडी’चा ससेमिरा लागला होता .गवळी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली. अनेक वर्षापासून पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना छोटी बहिण या नात्याने मी राखी बांधत आलेली आहे. आज दिनांक ११ रोजी मा पंतप्रधान महोदयांना राखी बांधण्याचे भाग्य प्राप्त झाले. यावेळी कौटुंबिक विचारपूसेसह मतदासंघांच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा झाली, असे भावना गवळी यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मात्र, सोशल मीडियावर भावना गवळी यांच्या या पोस्टची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. गवळी यांच्या एका निकटवर्तीयाला ईडीकडून अटकही करण्यात आली होती. मात्र, शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्तास्थापन केल्यानंतर भावना गवळी यांच्यापाठी लागलेली ‘ईडी-पीडा’ दूर होईल, अशी चर्चा होती. अशातच इतके दिवस केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर असलेल्या भावना गवळी रक्षाबंधनाच्या दिवशी थेट पंतप्रधान मोदी यांनी राखी बांधायला पोहोचल्या. त्यामुळे आता भावना गवळी यांच्यापाठी लागलेले ईडीचं सावट दूर होणार का, याविषयी चर्चांना उत आला आहे.