मुंबई (वृत्तसंस्था) भोसरी येथील भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा नसून तो खासगी मालकीचा आहे. या प्रकरणात आधी पाच वेळा चौकशी झाल्यानंतर प्रत्येकवेळी मला क्लीन चीट देण्यात आलेली आहे. परंतू भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरच ईडीची चौकशी सुरू झाली. त्यामुळे एक राजकीय षडयंत्र असल्याचे म्हणत खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी एकनाथराव खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. खडसे म्हणाले की, भोसरी येथील भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा नसून तो खासगी मालकीचा आहे. या प्रकरणात आधी पाच वेळा चौकशी झाल्यानंतर प्रत्येकवेळी मला क्लीन चीट देण्यात आलेली आहे. परंतू आपण भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीची चौकशी सुरू झाली. यामुळे हे राजकीय षडयंत्र आहे. परंतू आपण या सर्व प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. संबंधीत जागा ही एमआयडीसीने अधिग्रहीत केली नसल्याने हा व्यवहार पूर्णपणे वैध आहे. त्यामुळे इडीच्या चौकशीला आपण पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचेही खडसे म्हणाले.
एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होत. त्यानंतर दुपारी खडसे यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. खडसे यांना आज सकाळी अकरा वाजता ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे कळविण्यात आले होते. खडसे ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर मात्र, आज सकाळी राष्ट्रवादीने खडसे यांची प्रकृती बिघडल्यामुळे आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात येत असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. पत्रकार परिषद रद्द झाल्यामुळे खडसे ईडीच्या कार्यालयात जाणार नाहीत, अशी माहिती समोर येत होती. परंतू खडसे थोड्याच वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.