जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेत ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवींच्या २० टक्क्यांप्रमाणे बारा ठेवीदारांना २ लाख ४५ हजार रुपये अवसायकांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या पतसंस्थेचे ५० कोटी कर्ज असलेल्या मोठ्या कर्जदारांनी कर्जफेडीसाठी अवसायकांकडे अर्ज करून व्याजात सवलत देण्याची मागणी केलीये. दरम्यान, ओटीएस लागू झाल्यास कर्जवसुली होऊन ठेवीदारांना दिलासा मिळू शकतो, असे अवसायक नासरे यांनी सांगितले.
संस्थेच्या ठेवीदारांना २० टक्के ठेवी देण्यास प्रारंभ
तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्या काळात ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज केलेले होते. ज्या ठेवीदारांना ठेवी परत करण्यासाठी अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत, त्या ठेवीदारांना एकूण ठेवींच्या २० टक्के प्रमाणात ठेवी परत करण्यास बुधवारपासून प्रारंभ झाल्याचे अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी सांगितले. महिनाभरात होणाऱ्या वसुलीतून दर महिन्याच्या अखेरीस किंवा दोन महिन्यांनंतर ठेवीदारांना ठेवी परत करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. वसूल झालेल्या रकमेनुसार ऑनलाइन पद्धतीने ठेवी वाटपाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल. ठेवीदारांना १ ते १.५० लाखांपर्यंतच्या ठेवी वाटप करण्यात येतील.
ठेवीदारांना २ लाख ४५ हजार रुपयांच्या ठेवी परत केल्या
ठेवीदारांचा डाटाबेस व केवायसीसह पावत्या देण्यात आलेल्या आहेत. अशा ठेवीदारांना बुधवारी २ लाख ४५ हजार रुपयांच्या ठेवी परत करण्यात आल्या. बीएचआरवर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापेमारी केल्यानंतर या संस्थेचा कारभार पूर्णतः बंद होता. नवीन अवसायक रुजू झाल्यानंतर डाटा नसल्याने सुरुवातीच्या काळात त्यांना कामकाज करता आले नाही.
ओटीएससाठी केंद्रीय निबंधकांना भेटणार – अवसायक नासरे
बीएचआरचे ५० कोटी कर्ज असलेल्या मोठ्या कर्जदारांनी कर्जफेडीसाठी अर्ज केलेले आहेत. त्यांनी कर्जफेडीची तयारी दर्शवलेली आहे. त्यांना कर्जाच्या व्याजात सवलत हवी आहे. कर्जवसुली व ठेवी परताव्यासाठी एक कॉक्रीट योजना आवश्यक आहे. कर्जवसुलीसाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू करण्याबाबत केंद्रीय निबंधकांची भेट घेऊन मागणी करणार आहे. ओटीएस लागू झाल्यास कर्जवसुली होऊन ठेवीदारांना दिलासा मिळू शकतो, असे अवसायक नासरे यांनी सांगितले.