जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा अटकसत्र राबवीत जळगावमधील काही ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारांना नुकतीच अटक केलीय. यात कधीकाळी तेलगी आणि इंधन घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या अंतिम तोतलाच्या पत्नीसह भावाचाही समावेश आहे. तोतलाचे नाव मुद्रांक आणि इंधन घोटाळ्यानंतर देशभर चर्चेत आले होते. अगदी २००१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे सरकार अडचणीत आल्यानंतर आमदारांच्या बंगळुरूच्या दौर्यासाठी तोतलाने मुद्रांक घोटाळ्याचा पैसा खर्च केल्याच्या आरोप झाल्यानंतर तर राज्यातील राजकारणात प्रचंड खळबळ उडाली होती.
पेट्रोलियम उद्योगात ‘केरो किंग’ म्हणून उदयास
जळगाव शहरात जन्मलेल्या अंतिम तोतलाने अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेतले होते. साधारण १९९३ मध्ये १२ कोटीच्या उलाढालसह तोतलाने प्रोग्रेसिव्ह पेट्रोलियम नामक कंपनी सुरु केली होती. अवघ्या काही वर्षात या व्यवसायात प्रचंड मोठ्या प्रमाणात वृद्धी झाली होती. या कंपनीची कार्यालये फोर्ट, सांता क्रुझ मुंबई, वडाला याठिकाणी होती. तर जळगाव, चेन्नई, इंद्दोर, कोच्ची, कंडाला, मंगलोर, सिल्वासासह अनेक ठिकाणी कंपनीच्या शाखा होत्या. त्याची कंपनी केरोसीन, डीझेल,सल्फर, कोळशासह इतर इंधन प्रकारातही व्यवसाय करत होती. दरम्यान, त्याकाळात पेट्रोल, डीझेलमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळसाठी ‘नॅफ्था’चा वापर व्हायचा आणि भारतात ‘नॅफ्था’चा आयात करणाऱ्यापैकी तोतला एक मोठा डीलर होता. कालांतराने महाराष्ट्र आणि गोव्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तोतलाविरूद्ध भेसळीचे नऊ गुन्हे दाखल झाले होते.
सन २००५ मध्ये सीबीआयच्या विशेष पथकाने तोतलासह इतर जणांना पेट्रोल भेसळ प्रकरणात अटक केली. तोतलाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना घोटाळ्यामध्ये आपल्यासोबत काही राजकारणी आणि त्यांचे नातेवाईक सामील आहेत, असे सांगितल्याचे वृत्त समोर आल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली होती. अगदी तोतलाचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ट संबंध असल्याचे आरोप होते. तत्पूर्वी सन २००१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात सरकार संकटात सापडले होते. त्यावेळी तोतलावर अब्दुल करीम तेलगीच्या मुद्रांक घोटाळ्यातील पैसे आमदारांच्या बंगळुरूच्या दौर्यासाठी खर्च केल्याच्या आरोप झाल्यानंतरही राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. अर्थात तोतलाने सर्व चौकशीत सर्व आरोप फेटाळून लावले होते.
पेट्रोलियम डीलर मेहताने केली तोतला आणि तेलगीची ओळख
स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा कथित सूत्रधार अब्दुल करीम तेलगी हा १९९८ मध्ये जय किसन सिंह उर्फ बंगालीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने इंधनमध्ये भेसळ करण्यास केल्याचे सीबीआय चौकशीत समोर आले होते. तेलगीने इंधन भेसळच्या रॅकेटची माहिती सीबीआयच्या कोठडीत असतांना अधिकाऱ्यांना २००४ मध्ये दिली होती. त्यानुसार बंगाली आणि तेलगीने साधारण सहा वर्षापूर्वी इंधनात भेसळ सुरु करण्याचे काम इगतपुरीच्या रेल्वेयार्डमध्ये सुरु केले होते. तर मुंबईतील पेट्रोलियम डीलर मनोज मेहताने दोघांना सल्ला दिला होता की, ते या क्षेत्रात आपल्या जाळे पसरवू शकतात. मेहतानेच तेलगीला इंधन भेसळच्या व्यवसायात गुंतवणूक करायचा सल्ला दिला होता. परंतू या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी तेलगीकडे त्यावेळी पाहिजे तेवढा पैसा नव्हता. त्यामुळे जळगावच्या अंतिम तोतला सोबत तेलगीची पहिल्यांदा भेट आपण घालून दिल्याचीही माहिती मेहताने पोलिसांना दिली होती. तेलगीसोबतच्या भेटीनंतर तोतलाने प्रोग्रेसिव्ह पेट्रोलियम ली. नामक कंपनी सुरु केली होती.
इंधन भेसळ व्यवसायात काही राजकारण्यांनीही पैसे कमावले : तोतला
पेट्रोलमध्ये भेसळ केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केलेल्या अंतिम तोतलाने महाराष्ट्रातील काही राजकारणी आणि नोकरशहांची नावे घेतल्याच्या वृत्ताने त्याकाळात मोठी खळबळ उडवून दिली होती. तोतलाने या घोटाळ्यामध्ये काही राजकारणी आणि त्यांचे नातेवाईकही सामील असल्याचेही सीबीआयला सांगितल्याचे वृत्त समोर आले होते. मुद्रांक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने त्यावेळी तोतलाच्या सांताक्रूझ येथील कंपनीच्या आवारासह मेहुणे प्रकाश जाखेटे यांच्या खार येथील घरावर छापा टाकला होता. तसेच घरातून काही महत्वाची कागदपत्रे हस्तगत केली होती.
सीबीआयकडून जानेवारी २००५ मध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये नॅफ्था आणि सुपीरियर केरोसीन (एसकेओ) भेसळ केल्याबद्दल पॅराडाईस पेट्रोलियम लिमिटेड कंपनी जळगाव आणि प्रोग्रेसिव्ह पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (मुंबई) विरूद्ध सीबीआयने गुन्हा दाखल करण्यात आल होता. दुसरीकडे कार्यालय आणि घरी अनेक नोटीसा बजावून देखील सीबीआय समोर हजर न होणाऱ्या तोतलाचा नातेवाईक प्रकाश जाखेटेवर म्हणूनच सीबीआयच्या रडारवर आला होता. एवढेच नव्हे तर मुद्रांक घोटाळ्यात अहमदाबाद येथील फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत कोट्यवधींच्या मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी अंतिम तोतला आणि प्रकाश जाखेटे या दोघांची पॉलीग्राफ चाचणी घेण्यात आली होती.
सीबीआयला तोतलासह दोघांची चौकशीची परवानगी
अंतिम तोतला, वडील भगवानदास तोतला आणि नातेवाईक प्रकाश जाखेटेला १०० कोटीच्या नॅफ्था आणि इंधन घोटाळ्यात अटक मार्च २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. परंतू कोर्टात हजर होण्यापूर्वीच तिघांनी तब्येत खराब झाल्याची तक्रार करायला सुरुवात केली. छातीत दुखणे, उच्च रक्तदाब आणि उलट्या होत असल्याचे सांगत जीटी हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये दाखल झाले होते. यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरात यांनी तक्रार केली की, आरोपींनी कोठडी टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. गंभीर गुन्ह्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झालेत. जे.जे. हॉस्पिटलचे डीन डॉ.टी.पी.लहाने यांच्या सूचनेनुसार डॉक्टरांनी तिघांना दाखल केले. परंतू त्यांच्या अहवालात ईसीजी किंवा एक्सरेचा रिपोर्टचा उल्लेख नाहीय. त्यामुळे तिघांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यावर न्यायालयाने सांगितले की, जीटी रुग्णालयात तीन कैद्यांच्या मुक्कामाची सीबीआय चौकशी करू शकते.
बीएचआर घोटाळ्यात पत्नी आणि भावाचे नाव
बीएचआर घोटाळ्यात नुकतीच ११ लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यात संजय भगवानदास तोतला (रा.प्लाट नं. ५२ प्रभा हाऊसिंग सोसायटी, पिप्राळा रोड शाहूनगर जळगाव) आणि जयश्री अंतिम तोतला (रा. ६०१, ६ वा मजला आर्चीड ५ वा रोड खार जिमखाना जवळ खार वेस्ट, मुंबई) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या तपासात जयश्री तोतलाचा गुन्ह्यातील सहभाग आढळून आलेला आहे. त्यानुसार बीएचआर संस्थेत नवीपेठ येथे कर्ज खाते क्रमांक – ०००३२०७०००५६ मधील एकूण बाकी रक्कम १,६५,४९,३४८ यापैकी १,३९,४९,३४८ रुपये ही रक्कम वेगळ्या ठेवदारांच्या ठेवी कमी किमतीत घेऊन पुर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला. असे करतांना तिने स्वतःनेमलेल्या एजंट मार्फत ठेवीदारांमध्ये सदर पतसंस्था बुडाली असुन जी रक्कम मिळत आहे, ती गुपचुप पदरात पाडून घ्या. नाही तर ती पण मिळणार नाही. कुणालाच ठेवीचे पैसे मिळणार नाही. ठेवीदारांच्या ठवी बुडल्यात जमा आहे. पतसंस्थेकडून पैसे मिळणे अश्यक्य आहे, अशी भीती निर्माण करून त्यांना फक्त 30 टक्के रक्कम देऊन ठेवपावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले आहे.
संजय तोतला याने देखील बीएचआर पतसंस्था शाखा नवीपेठ जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००३२०७०००४३ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १,०२,९३,६७२/-पैकी ९१,४१, १७२/ रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या २१ मुदतठेव पावत्या ३० ते ३५ टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने काहीही झाले तरी तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहीत. मी सांगतो तसे केले तरच ३५ टक्के पर्यंत रक्कम मी तुम्हाला मिळवून देईन, आत्ता इतकेच पैसे घ्या नाहीतर ते पण मिळणार नाहीत, पतसंस्था बुडाली असून तुम्हाला जास्तीत जास्त ३५ टक्के रक्कमच करही दिवसांनी मिळेल अन्यथा कसलीच रक्कम मिळणार नाही. त्यासाठी तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व आम्ही स्टॅम्पपेपरवर तयार करून आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर तुमच्या सह्या करून दयाव्या लागतील. तरच रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असल्याचे सांगून ठेवीदारांमध्ये भितीचें वातावरण निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंट अशोक रूणवाल करवी ठेवीदारास ३५ टक्के रक्कम घेण्यास भाग पडल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलीस तपासात आतापर्यंत बीएचआर घोटाळ्यातील अपहाराची रक्कम ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपये एवढी आढळून आलेली आहे.