जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पोलीस कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींपैकी एकानेही संपूर्ण घोटाळ्याची माहिती पोलिसांना दिली नाही. त्यामुळे अटक आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात तब्बल २१ महत्वपूर्ण कारणे दिली होती. या कारणांमधून गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याचे लक्षात येत असून अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी दिलेली २१ कारणे
१. अटक आरोपी प्रेम रामनारायण कोगटा यांनी गुन्हयाचे झाले तपासात बीएचआरचे ठेवीदार त्यांच्याकडे ठेवी घेवुन येत असलेबाबत सांगतात. परंतु त्यांना एकाही ठेवीदारांचे नाव सांगता येत नाही. तसेच ठेवी आपल्या कर्जात वर्ग करणेकामी त्यांना मदत करणारे बीएचआर पतसंस्थेतील कर्मचारी तसेच स्टॅम्प आणणारे व बनावट कागदपत्रे तयार करणा-या एजंटची नावे सांगत नाहीत. याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे.
२. अटक आरोपी जयश्री अंतिम तोतला यांना कर्जाबाबत काहीच माहिती नसुन त्यांचे पती अंतिम तोतला यांनी सर्व व्यवहार केल्याचे सांगुन उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यांचे पती अंतिम तोतला यांच्याकडे पुढील चौकशी करणे आहे.
३. अटक आरोपी अंबादास आबाजी मानकापे हे गुन्हयाचे तपासात बीएचआर पतसंस्थेकडुन घेतलेले कर्ज ठेवीदारांच्या ठेवी मॅच करुन कर्ज खाते निरंक केले बाबत सांगत असुन यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी स्टॅम्प कोणी आणले तसेच प्रतिज्ञापत्र कोठे तयार केले याबाबत काहीएक माहिती सांगत नसुन याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे.
४. अटक आरोपी भागवत गंणपत भंगाळे यांचेकडे चौकशी करता आरोपी हा इसम नामे अशोक सेन याने कागदपत्रे तयार करणेकामी मदत केल्याचे सांगुन त्याबाबत अधिक काहीएक माहिती सांगत नाही. तसेच इतर एजंटची नावे सांगत नसुन याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे.
५. अटक आरोपी छगन शामराव झाल्टे याने तपासात बीएचआर पतसंस्थेतील एका कर्जाबाबत माहिती सांगुन दुस-या कर्जाबाबत काहीएक माहिती सांगत नाही. तसेच ठेवी मॅच करणेकामी मदत केलेल्या एजंटची माहिती सांगत नाहीत याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे.
६. अटक आरोपी जितेंद्र रमेश पाटील हे यातील आरोपी जितेंद्र कंडारे व सुनिल झंवर यांना ओळखत असल्याचे सांगुन आरोपी जितेंद्र कंडारे यांचेकडुन रोज वेगवेगळे एजंट चिठ्या घेवुन येत असलेबाबत सांगुन त्यांची नावे सांगत नाही. याबाबत आरोपीकडे सखोल तपास करणे आहे.
७. अटक आरोपी आसिफ मुन्ना तेली याने आपल्या चौकशीत एजंट अजय ललवाणी याने ठेवी मॅच करणेकामी मदत केल्याचे सांगुन एजंट अजय ललवाणी बाबत काहीएक माहिती देत नाही. आरोपीकडे अजय ललवानी बाबत अधिक तपास करणे आहे.
८. अटक आरोपी जयश्री शैलेश मणियार हिने तपासात बनावट कागदपत्रे तिचे वतीने कोणी तयार केले याबाबत माहीती देत नसून आपण केवळ पेपर सहया करून इसम नामे योगेश मालपाणी याचे माणसांकडे दिलेबाबत सांगत आहे. आरोपी योगेश मालपाणी या इसमाबाबत काहीएक माहीती देत नाही. तरी आरोपीकडे योगेश मालपाणी या इसमाचे सहभागाबाबत अधिक तपास करणे आहे.
९. अटक आरोपी संजय भगवानदास तोतला यास जितेंद्र कंडारे, सुजित वाणी व बीएचआर ऑफिसमध्ये काम करणारे सोनवणे यांच्या मदतीने कर्ज निरंक केल्याचे सांगत आहे. परंतु सोनवणे याबाबत अधिक माहिती देत नाही. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास करणे आहे.
१०. अटक आरोपी राजेश शांतीलाल लोढा याने तपासात आपण स्वतः ठेवीदारांकडून मूळ पावत्या घेवून त्यांची कागदपत्रे बनविल्याचे सांगत आहे परंतु त्याला कंडारे नावाच्या इसमाने मदत केल्याचे सांगून त्याचेबाबत अधिक माहीती सांगत नाही. याबाबत आरोपीकडे तपास करून आरोपीला बनावट कागदपत्रे तयार करणेस मदत करणारा कंडारे नामक इसमाचा शोध घेणे आहे.
११. अटक आरोपी प्रितेश चंपालाल जैन याने तपासात त्याला बनावट कागदपत्रे तयार करण्यास अजय ललवाणी, अशोक रुणवाल व आणखी एका एजंटने मदत केल्याचे सांगत आहे. परंतु त्यांचे बाबत अधिक माहिती दिलेली नाही, त्या एजंटाबाबत आरोपीकडे तपास करून त्यांना गुन्हयात अटक करणे आहे.
१२. अटक आरोपी यांकडे गुन्हयाचा प्राथमिक तपास करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान आरोपींनी त्यांचे गुन्हयातील सहभागाबाबत माहीती दिलेली आहे. अटक आरोपींनी गुन्हा करताना त्यांना साथ देणारे बीएचआर मधील अधिकारी, कर्मचारी, एजेंट व इतर आरोपी यांची अर्धवट माहीती दिलेली आहे. सदरचे सर्व इसम हे जळगाव व इतर जिल्हयातील रहीवासी असल्याने त्यांच्याबाबत आरोपीकडे अधिक तपास करणे आहे.
१३. अटक आरोपी यांनी प्राथमिक तपासात बीएचआर कडून घेण्यात आलेले कर्ज रक्कम व्यवसायाकरीता वापरली असे सांगत असून त्याबाबत अधिक काही माहीती सांगत नाही, तरी बीएचआर कडून घेतलेली कर्ज रक्कमेचा आरोपींनी नेमका कशासाठी वापर केला आहे. याबाबत अटक आरोपींकडे सखोल तपास करणे आहे.
१४. अटक आरोपी यांनी प्राथमिक तपासात ठेवीदारांना रोख पैसे दिल्याचे सांगत आहेत. सदरचा पैसे मोठया प्रमाणावर असून ती रक्कम आरोपींनी कोठून आणली याबाबत आरोपी समाधानकारक उत्तरे देत नाहीत तरी या रकमेबाबत आरोपींकडे सखोल तपास करणे आहे.
१५. अटक आरोपी यांनी गुन्हा करणेपूर्वी पाहिजे आरोपी जितेंद्र कंडारे व इतर यांची भेट घेतल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे. अटक आरोपी व पाहिजे आरोपी जितेंद्र कंडारे यांचेत गुन्हयाचा कट कशाप्रकारे झाला याबाबत आरोपींकडे अधिक तपास करणे आहे.
१६. नमूद अटक आरोपी यांनी ठेवीदारांच्या ठेवपावत्या गोळा करण्यासाठी नेमलेले एजंट नामे अनिल पगारीया, संतोष बाफना, अजय ललवाणी, उदयकुमार कांकरीया, रमेश जैन, अजय जैन, अशोक रूणवाल, शिरीष कुवाड, अतुल गांधी व वसंत चव्हाण यांचेबाबत संपूर्ण माहीती दिलेली नाही, यांचे निश्चीत सहभागाबाबत तसेच आणखीन कोणी एजंट होते त्यांचा नमूद गुन्हयात सहभाग काय आहे याबाबत आरोपींकडे अधिक तपास करणे आहे. तसेच वरील एजंट यांचेकडे देखील आरोपी समक्ष चौकशी करणे आवश्यक आहे.
१७. अटक आरोपी यांनी ठेवीदारांच्या देव पावत्या आपल्या कर्ज रकमेत वर्ग करताना स्वतः तसेच एजंट मार्फत बेकायदेशिरपणे प्रतिज्ञापत्र तयार केलेले आहेत. सदरचे प्रतिज्ञापत्र बनविताना आरोपींनी ठेवीदारांची व स्वतःची अर्धवट माहीती भरून ते प्रतिज्ञापत्र कायदेशिर असल्याचे भासविलेचे तपासात निष्पण्ण झाले आहे. सदर अटक आरोपी हे बनावट प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यासाठी स्टॅम्पपेपर कोठून खरेदी केले, त्याच्या नोटरी कोठे केल्या याबाबत समाधानकारक माहीती देत नसून याबाबत त्यांचेकडे तपास करणे आहे. याबाबत आरोपीकडे अधिक तपास करणे आहे.
१८. अटक आरोपीकडे झाले प्राथमिक तपासात बरेच आरोपी हे नमूद गुन्हयातील आरोपी नामे सुनिल झंवर यांना ओळखत असल्याचे सांगून त्यांचेशी कोणताही आर्थिक व्यवहार नसल्याचे सांगत आहेत, परंतु आरोपी सुनिल झंवर व सुरज झंवर यांचे कार्यालयात मिळालेल्या संगणकावरील डाटा मध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या व कर्ज निरंक दाखले मिळून आलेल्या आहेत, त्यामुळे त्याचेशी नमूद अटक आरोपींचा संबंध दिसून येत आहे. याबाबत सर्व आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून त्याबाबत आरोपींकडे अधिक सखोल तपास करणे आहे.
१९. सदर अटक आरोपींच्या बँक खात्यांची गुंतवणुकींची व मालमत्तेची माहिती बाबत आरोपी पूर्ण माहीती देत नाहीत. तरी अटक आरोपीकडे याबाबत अधिक सखोल तपास करणे आहे.
२०. आरोपी हे जळगाव, धुळे, भुसावळ, मुंबई व औरंगाबाद येथील रहिवासी असुन त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी वर्ग करून घेतल्या आहेत. त्यामुळे पुरावे गोळा करण्यासाठी विविध जिल्ह्यात तपासकामी आरोपीसह जावून तपास करणे आवश्यक आहे.
२१. सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असून यामध्ये मोठया प्रमाणावर आर्थिक अपहार व गैरव्यवहार हा संगनमताने व पूर्व नियोजित कटाने झालेला आहे. गुन्हयाची व्याप्ती मोठी आहे. नमूद अटक आरोपी यांची संख्या जास्त असून आरोपींना अटक केल्यापासून त्यांची वेळोवळी वैदकीय चाचणी करणे, त्यांचेकडे प्राथमिक चौकशी करणे यामध्ये बराच वेळ गेल्याने वेळेअभावी आरोपींकडे सखोल चौकशी करता आलेली नाही. अटक आरोपींनी गुन्हयातील आपले सहभागाबाबत माहीती दिलेली असून सदर गुन्हयात यापूर्वी जप्त करण्यात आलेला दस्त ऐवजी पुरावा यामध्ये नमुद अटक आरोपी यांचेबाबत नोंदी / पुरावे मिळालेले आहेत. त्याबाबत या आरोपींकडे वेळे अभावी तपास करता आलेला नाही. सदरचे दस्तऐवज आरोपींना दाखवून याबाबत आरोपींकडे समक्ष तपास करणे आहे.