जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात आज अटक केलेल्या संशयित आरोपींनी पावत्या मॅच करून कर्ज फेडले असावे आणि त्यातूनच त्यांना अटक झाल्याची चर्चा आहे. परंतू आर्थिक गुन्हे शाखेकडून अद्याप आरोपींच्या अटकेची नेमकी कारणे सांगण्यात आलेली नाहीत. परंतू अवघ्या ३० टक्क्यात पावत्या मॅच करून कोट्यावधीची कर्जफेड करणाऱ्या बड्या हस्ती आता आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एका आमदाराच्या नावावर २ कोटीचे कर्ज बीएचआरमधून काढण्यात आले होते. याच कर्जाच्या मुद्यावरून २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेस मोठा वाद निर्माण झाला होता. ‘त्या’ आमदाराने काढलेले हेच २ कोटीचे कर्ज कालांतराने इतर कर्जांप्रमाणे पावत्या मॅचिंग करून भरल्याची खळबळजनक माहिती काही महिन्यांपूर्वीच समोर आली होती.
गेल्या काही वर्षांपासून भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत हजारो खातेदारांचे पैसे अडकले आहेत. ठेवीदारांना शेकडा ३० ते ३५ रुपये देऊन त्यांचे पैसे कर्ज खात्यात वर्ग करून ठेवीदारांची लूट केली जात असल्याचा आरोप सुरुवाती पासून होत आहे. तसेच ठेवीदारांचे पतसंस्थेत कोट्यवधी रुपये अडकल्यामुळे एखाद्या ठेवीदाराचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात भरुन घेतले जात असल्याच्या देखील तक्रारी होत्या. त्यासाठी प्रतिज्ञा पत्राचा आधार घेतला गेला होता. त्यानुसार ठेवीदाराला आपल्या ठेवींचा सर्व तपशील, ठेव पावती क्रमांक, त्याची रक्कम प्रतिज्ञा पत्रात नमूद करावी लागत होती. या ठेवी अमुक व्यक्तीच्या कर्ज खात्यात भरण्यास अथवा वर्ग करण्यास हरकत नसल्याचे शपथ पत्रात नमूद करावे लागत होते. ठेवीदारांच्या मजबुरीचा फायदा घेऊन असे व्यवहार केले जात असल्याचा आरोप होत होता. दरम्यान, काही जणांनी जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, महावीर जैन, विवेक ठाकरे यांच्यासोबत संगनमत करून अनेक ठेवीदारांची दिशाभूल केल्याचे तपासात समोर आले आहे. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग करून देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. ३० टक्के रक्कम ठेवून घेत ठेवीदारांना ठेवीतील ७० टक्के पैसे परत करण्याचे काम करण्यात आले होते.
जितेंद्र पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई) या संशयितांचा समावेश आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयित आरोपींनी देखील पावत्या मॅच करून कर्ज फेडले असावे आणि त्यातूनच त्यांना अटक झाल्याची चर्चा आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून अद्याप आज अटक केलेल्या आरोपींच्या अटकेची नेमकी कारणे सांगितलेली नाहीत. दरम्यान,पावत्या कोण मॅचिंग करून भरायला सांगत होते?, त्या पावत्या कोण-कोणत्या ठेवीदारांच्या होत्या? आणि सर्वात महत्वाचं हा सगळा व्यवहार कुणी जुळवून आणला?, हे पुढील तपासात समोर येण्याची शक्यता आहे.