जळगाव (प्रतिनिधी) अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीएचआर घोटाळ्यात जाबजाबाब घेण्यासाठी आज सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात पुन्हा धडकल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात आल्याचे वृत्त पसरताच अनेकांच्या मनात धडकी भरली होती.
यासंदर्भात अधिक असे की, बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर आणि तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांना अटक केल्यानंतर आज पहिल्यांदा पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा जळगावात येऊन धडकले आहे. या पथकात पोलीस निरीक्षक श्री.भोसले यांच्यासह इतर तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बीएचआर घोटाळ्यातील काही प्रमुख साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासाठी हे पथक जळगावात आले असल्याचे कळते. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक नेमकं कुणाचे आणि किती जणांचे जबाब घेणार आहे?, याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळू शकली नसली, तरी ज्या साक्षीदारांचे जबाब होणार आहेत ते महत्त्वपूर्ण साक्षीदार असल्याचे कळते.
दुसरीकडे मुख्य संशयित सुनील झंवर याच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाने आपापली बाजू मांडली असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.