जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, यासाठी अॅड. प्रवीण चव्हाण यांचा सुरू असलेला जोरदार युक्तिवाद आज पूर्ण झालाय. सोमवारी यावर ते अंतिम म्हणणे सादर करण्याची शक्यता आहे. सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आरोपांच्या जामिनाला जोरदार विरोध केला आहे.
अॅड. प्रवीण चव्हाण यांनी संशयित आरोपींच्या जामीन अर्जाला कालपासून युक्तिवादद्वारे विरोध करायला सुरुवात केली आहे. अॅड. चव्हाण यांनी न्यायालयासमोर अनेक गोष्टी पुराव्यानिशी मांडल्या होत्या. तसेच पुरावे म्हणून अॅड. चव्हाण यांनी कालप्रमाणे आज देखील अनेक पुरावे न्यायालयासमोर ठेवले.
दरम्यान, सोमवारी ५ संशयितांच्या वकिलांनी जामीनासाठी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली होती. तर याआधी २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या वकिलांनी आपले म्हणणे कोर्टासमोर सादर केलेले आहे. बीएचआर मधील साधारण १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२० आणि २०२१ अशा दोन वेळी राज्यात छापेमारी करून बीएचआर घोटाळ्यातील संशयितांना अटक केली आहे.
यातील १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), राजेश लोढा (जामनेर) या संशयितांनी जामिन अर्ज दाखल केले होते. तर यापैकी जयश्री तोतला आणि जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने २५ जून आधीच फेटाळून लावलेला आहे.
त्यानंतर २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या जामीन अर्जावर सुनवाईच्या वेळी आपली बाजू मांडली आहे. तर ५ जुलैला छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, प्रितेश चंपालाल जैन, प्रेम नारायण कोकटा, राजेश लोढा या उर्वरित संशयितांच्या वतीने अॅड. सुधीर शहा आणि एस.पी. जैन यांनी युक्तिवाद केला होता. ६ जुलैला सुजित वाणी, संजय तोतला आणि अंबादास बाबाजी मानकापे या तिघांच्या वकिलांनी आज जामीन अर्जावर आपली बाजू मांडली. दरम्यान, आज (गुरुवार) पासून सरकार पक्षाने युक्तिवाद सादर करायला सुरुवात केली आहे. आज अपूर्ण राहिलेला युक्तिवाद सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण उद्या (शुक्रवार) रोजी पूर्ण करण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सर्व जामीन अर्जावर कामकाज सुरु आहे.