जळगाव (प्रतिनिधी) आयुष्याची सगळी कमाई पाण्यात गेल्याचे वाटत असतानाच पुणे आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर घोटाळ्यात सुरु केलेल्या अटकसत्रानंतर ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील ठेवीदारांचे करोडे रुपये अडकलेले असून त्यांनी ‘क्लिअर न्यूज’सोबत संपर्क साधून आपली आपबिती सांगितली.
बीएचआर घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच ११ संशयिताना ताब्यात घेतले होते. त्यात अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे) यांचा समावेश होता. तर सोमवारी रात्री मुख्य संशयित आरोपी तथा अवसायक जितेंद्र कंडारेला इंदूरमधून अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियात या बातम्या व्हायरल झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील येवला येथील अनेक ठेवीदारांनी ‘क्लिअर न्यूज’सोबत संपर्क साधून आपली आपबिती सांगितली. तसेच आता तरी प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे.
येवला येथील उत्तम दर्शन बांगर (२६ लाख ५० हजार), सोपान म्हातारबा सानप (६ लाख ४१ हजार ८३ रुपये), शोभा सोपान सानप (मयत, ४ लाख ५४ हजार २८८ रुपये), प्रशांत सोपान (३ लाख ९५ हजार ५२८ रुपये), स्मिता सोपान सानप (१ लाख १५ हजार १३१ रुपये), दिलीप भिका नागरे (७ लाख), देवराम नाथू नागरे (४ लाख), देविदास देसले (दीड लाख), यादव रंगनाथ चव्हाण (१५ लाख रुपये) अद्यापही अडकलेले आहेत. यातील एकट्या सानप परिवाराचे १६ लाखहून अधिक पैसे अडकले आहेत. बँक मूळ जळगावची असल्यामुळे बाहेर गावच्या ठेवीदारांना नेमका न्याय कुठं आणि कशा पद्धतीने मागवा असा प्रश्न पडलेला आहे. दरम्यान, दोषींकडून पैसे वसुली करून ठेवीदारांना त्यांच्या हक्काची आणि कष्टाची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी होत आहे.
विजय वाघमारे (९२८४०५८६८३)