जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात भाजपाचे विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या बातम्या काल रात्रीपासून प्रसारित होत आहेत. परंतू आ. पटेल यांच्याविरुद्ध बीएचआर घोटाळ्यात कोणताही नवीन गुन्हा दाखल झालेला नसून फक्त डेक्कन पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्यातच ते पोलीस तपास अन्य आरोपी म्हणून निष्पन्न झालेले आहेत.
बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा नोंदवला आहे, अशा आशयाच्या बातम्या काही माध्यमांना प्रसारित केल्या होत्या. परंतू मुळात आर्थिक गुन्हे शाखेने असा कोणताही नवीन गुन्हा बीएचआर प्रकरणी दाखल केलेला नाहीय. डेक्कन पोलीस स्थानकात रंजना खंडेराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केल्यानंतर फिर्यादीत नावे नसलेले इतर अनेक आरोपी निष्पन्न झाले होते. आ. चंदुलाल पटेल यांचेही नाव या गुन्ह्यात १७ जून रोजी राबविलेल्या अटकसत्रानंतरच समोर आले होते. पोलिसांनी चंदुलाल पटेल यांच्याही अटकेचे वॉरंट घेतले होते. परंतू पटेल थोडक्यात इंदूरमधून पोलीसांचे पथक येण्याआधीच तेथून पसार होण्यात यशस्वी झाले होते.
















