जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेत अडकलेले पैसे परत मिळावे म्हणून ठेवीदाराने पंतप्रधान, राष्ट्रपतींसोबत झालेल्या पत्रव्यवहारालाही अवसायक जितेंद्र कंडारे केराची टोपली दाखवायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर, एका ठेवीदाराचे पैसे परत द्यावेत म्हणून जळगावच्या खासदाराने दिलेले पत्र तर कंडारेने अक्षरक्ष: फेकून दिले होते. याबाबत नाशिक जिल्ह्यातील ठेवीदार उत्तम दशरथ बांगर यांच्या मुलाने ‘क्लिअर न्यूज’ सोबत संपर्क साधत सर्व कागदपत्र पाठवली.
ठेवीदार उत्तम दशरथ बांगर (वय ६० वर्षे, पत्ता :- मु. पो. मातुलठाण ता. येवला. जि. नाशिक) यांनी अवसायक कंडारेला १७ जून २०१९ रोजी निवेदन दिले होते. त्यानुसार मी आपणांस वेळोवेळी अर्ज करून, फोन करून व प्रत्यक्ष भेटायला येऊन सुध्दा मला तुम्ही भेटत नाही व तुम्हाला भेटुही देत नाही. माझ्या अर्जाचे कुठलेही उत्तर नाही. मला माझे पैसे परत हवे आहे. मी अत्यंत आजारी असून माझ्या घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या ढासाळलेली आहे. मला माझ्या पैशांची अत्यंत गरज आहे. मी तुम्हाला पंतप्रधानांमार्फत आलेल्या पत्राची छायांकित प्रतही पाठवत आहे. मला माझ्या पैशांची लवकरात लवकर परत फेड करावी ही, अशी विनंती उत्तम बांगर यांनी केली होती. परंतू कंडारेने ठेविदारची साधी भेट घेण्याचे सुद्धा टाळले होते.
पंतप्रधानांसोबत पत्रव्यवहार
शेतकरी तथा ठेवीदार उत्तम बांगर यांनी ८ एप्रिल २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात म्हटले होते की, येवला जिल्हा नाशिक (महाराष्ट्र) येथे भाईचंद हिराचंद मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी मध्ये ठेवी ठेवल्या होत्या. परंतु ही संस्था डबघाईला आलेली आहे. संस्थेच्या महाराष्ट्रात व इतर राज्यांत २६२ शाखा होत्या. अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून सदर पतसंस्था बुडीत निघालेली आहे व पतसंस्थेवर अवसायक नेमलेला आहे. आम्ही गरीब आहोत आमच्या म्हतारपणासाठी ठेवलेले पैसे बुडाल्यामुळे अडकले आहेत. तरी या प्रकरणी आपण स्वतः लक्ष घालुन आमच्या ठेवी आम्हांस परत मिळणेकामी सहकार्य करावे ही नम्र विनंती.
फक्त २०टक्के रक्कम तरीही खात्यामध्ये पैसेच जमा नाहीत
सदर पतसंस्था ओरीजनल ठेव पावत्या जमा करून फक्त २०टक्के रक्कम देत आहे व उरलेली रक्कम सेव्हींग खात्यामध्ये टाकु असे सांगतात. परंतु सदरची रक्कम सेव्हींग खात्यामध्ये जमा झालेली नाही. तसा कोणताही पुरावा नाही तसेच सेव्हींग खात्यावरचे पैसे देत नाही. सदर भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑ. सोसायटी लि. जळगाव (महाराष्ट्र) या संस्थेस माननिय सेंट्रल रजिस्ट्रार, गर्व्हमेंट ऑफ इंडीया, मिनीस्ट्री ऑफ अग्रीकल्चरची मान्यता आहे. महाराष्ट्रातील सहकार आयुक्त पुणे, डीपार्टमेंट ऑफ को-ऑपरेशन, मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, मा. सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचेकडे तक्रार करूनही कोणीही दखल घेतली नाही व आम्हास न्याय मिळाला नाही, असे पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे याचिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवल्यानंतर ठेवीदार असलेल्या ८ शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार उर्मिला उमेश शेलार, आप्पसाहेब दगू राकवडे, सोपान म्हातारबा सानप, उत्तम दशरथ बांगर, प्रशांत सोपान, शोभा सोपान सानप, स्मिता सानप, आत्माराम दगू जगताप यांच्या याचिकेवरून २१ एप्रिल रोजी अवसायकाला पत्रव्यवहार केला होता.
राष्ट्रपतींकडे दया विनंती अर्ज
ठेवीदार उत्तम बांगर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया वजा विनंती अर्ज २० नोव्हेंबर २०१९ रोजी केला होता. त्यात त्यानिऊ म्हटले होते की, मी माझ्या मुलांच्या लग्नासाठी व स्वतःच्या औषधोपचारासाठी बचत खात्यातील रक्कमेची सा.वाले यांचे कडे सन २०१४ पासून मागणी केली व करत आहे. सा.वाले यांनी मला बचत खात्यातील पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. सदरची रक्कम परत मिळणेकामी मी सा.वाले यांना दिनांक २०/०१/२०१५ १०/०२/२०१६, २९/०३/२०१६, ०४/०८/२०१६, १९/०७/२०१७ रोजी समक्ष अर्ज देऊन व विनंती करुनही उत्तर देत नाही. मी वयोवृध्द शेतकरी ज्येष्ठ नागरिक असून माझ्या पाठीमागे माझी पत्नी, मुले, नातवंडांची जबाबदारी असून या सर्व गोष्टींना सामोरे जाणे शक्य होत नाही, मला माझ्या फिक्स डिपॉझीट खात्यावर जमा असलेली रक्कम रूपये २६,४०,०००/- व त्यावरील व्याज अशी संपूर्ण रक्कम वसूल होणे कामी आपले स्तरावरून प्रयत्न करावे ही आपनाकडे कळकळीची विनंती. दरम्यान, राष्ट्रपती कार्यालयाकडून अद्याप बांगर यांना कुठलेही उत्तर मिळालेलं नाहीय.
खासदार उन्मेष पाटील यांचे अवसायकाला पत्र
ठेवीदार उत्तम बांगर यांचे पैसे परत मिळावेत म्हणून खासदार उन्मेष पाटील यांचे अवसायक जितेंद्र कंडारेला पत्र पाठवले होते. त्यात खा. पाटील यांनी म्हटले होते की, मी पाठवीत असलेली व्यक्ती, उत्तम दशरथ बांगर हे माझे परिचित आहे. त्यांनी आपल्या संस्थेत सन २०१४ पासून रक्कम २,०१,५४३ व २४,४०,००० रु. रक्कम एफडी रुपात ठेवेलेली आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून त्यांच्या पत्नीची तब्येत अत्यंत खराब झाली आहे. त्याकरिता त्यांना सदर एफडीची रक्कम परत पाहिजे आहे. तरी त्यांना पैसे परत मिळण्याकामी योग्य ते सहकार्य करावे. परंतू हे पत्र बांगर यांचा मुलगा घेऊन गेल्यानंतर कंडारेने ऐसा किसी भी का पत्र लाते क्या?. म्हणत ते पत्र फेकून लावले होते.
















