जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या तिघां संशयित आरोपींन न्यायालयात हजर केले होते. यातील प्रेम रामनारायण कोगटा (रा. ६९, एमआयडीसी) याचा गुन्हयातील सहभाग कसा आहे?, याबाबत पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार पतसंस्था बुडाल्याची भीती निर्माण करून ३० टक्क्यात ठेवपावत्यांची खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटनुसार प्रेम रामनारायण कोगटा (रा. ६९ एमआयडीसी एरिया जळगाव याचा गुन्हयातील सहभाग मोठा आहे. सदर आरोपी याने बीएचआर पतसंस्था नवी पेठ जळगाव येथे त्याचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००३२०७००२४७ मधील एकूण रक्कम रुपये २,१५,१२,६८९/- ही सर्व रक्कम वेगवेगळ्या ठेवीदारांचे कमी किमतीत घेवून पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. असे करताना त्याने स्वतः नेमलेल्या एजंट मार्फत ठेवीदारांमध्ये सदर पतसंस्था बुडाली असून मुदत ठेवीच्या ३० टक्के रक्कम मिळेल. परंतु त्यासाठी मुळ पावत्या जमा करून तयार करून आणलेल्या प्रतिज्ञा पत्रावर सह्या कराव्या लागतील. अन्यथा कोणाला ठेवीचे पैसे मिळणार नाहीत, ठेवीदाराच्या ठेवी बुडाल्यात जमा आहेत. पतसंस्थेकडून पैसे मिळणे अशक्य आहे, अशी मिती निर्माण करून त्यांना फक्त ३० टक्के रक्कम देवून ठेवपावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले आहे.