जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या एका कथित डायरीत तब्बल २२१ कोटींचा हिशोब लिहिलेला असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. या कथित डायरीतील हिशोबामुळे एक माजी मंत्री आणि त्याच्याकडे कार्यरत असलेला तत्कालीन बडा अधिकारीही रडारवर येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याआधी देखील पोलिसांना सापडलेल्या एका डायरीत नगरसेवकांना देण्यात आलेल्या पैशांचा लेखाजोखा होता, असे आरोप झाले होते.
बीएचआर घोटाळ्यात मागील काही दिवसापासून जळगावसह मुंबईच्या राजकीय वर्तुळात एक खळबळजनक चर्चा मागील काही दिवसापासून सुरु आहे. या चर्चेनुसार बीएचआर घोटाळ्याच्या धाडसत्रावेळी पोलिसांना सध्या फरार असलेल्या एका संशयित आरोपीच्या कार्यालयातून डायरी मिळाली होती. या डायरीत तब्बल २२१ कोटींचा हिशोब लिहिलेला असून हा पैसा एका मंत्र्याचे कलेक्शन असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या डायरीत सांकेतिक स्वरुपात विभाग निहाय झालेल्या वसुलीचा तपशील असल्याची देखील चर्चा आहे.
संबंधित अधिकारी सध्या एका बड्या विद्यमान मंत्र्याकडे सेवा बजावतोय. त्यामुळे तिथून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा देखील मुंबईच्या वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे तो माजी मंत्री देखील एका राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे कळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या डायरीतील नमूद पैशांच्या हिशोबाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्याची चौकशी होऊ शकते. एवढेच नव्हे तर संबंधित माजी मंत्र्याला देखील चौकशीला सामोरे जावे लागू शकते. परंतू फरार आरोपी जोपर्यंत पोलिसांना सापडत नाही, तोपर्यंत या डायरीतील २२१ कोटीचा हिशोब नेमका कसला आहे?, याबाबत खुलासा होऊ शकत नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
याआधी देखील धाडसत्रात त्याच फरार संशयिताच्या कार्यालयात सापडलेल्या एका डायरीत नगरसेवकांना देण्यात आलेल्या पैशांचा लेखाजोखा होता. एवढेच नव्हे तर, त्यात सांकेतिक अर्थात शॉर्टकट पद्धतीने नाव लिहिलेली असल्याची चर्चा होती. परंतू पोलिसांना खरच अशीच काही आणखी दुसरी डायरी सापडली आहे का?, सापडली असेल तर त्यात खरच असा काही हिशोब लिहिलेला आहे का?, या प्रश्नांची उत्तर येणाऱ्या काळातच मिळतील. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यातून अनेक इतर घोटाळे समोर आले आहेत. त्यात आता या कथित डायरीतील २२१ कोटीच्या कथित हिशोबाची भर पडल्यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चर्चेला उधान आले आहे.
विजय वाघमारे (९२८४०५८६८३ )