जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर याने पूर्वनियोजित कटानुसार इतर संशयित आरोपींशी संगनमत करून बहुतांशी बीएचआरची मालमत्ता विक्रीच्या ई- टेंडरिंगमध्ये आपल्या संस्था व त्यांचे शालेय पोषण आहाराचे कामासाठी वाहन पुरविणारे ठेकेदार, पोषण आहार पुरविणारे सब ठेकेदार यांच्या नावाने टेंडर भरलेले आहेत किंवा इतरांच्या नावाने भरलेल्या टेंडरमध्ये त्यांना प्रतिनिधी म्हणून पाठविल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. अशा तब्बल २२ लोकांची नावे पोलीस चौकशीत समोर आली आहेत. एवढेच नव्हे अनेक गंभीर आरोप झंवरवर पोलिसांनी ठेवले आहेत.
बीएचआर घोटाळ्यात आज पोलिसांनी मुख्य सूत्रधार सुनील झंवरला न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी संशयित आरोपी सुनील देवकीनंदन झंवर याचा गुन्ह्यातील सहभाग न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.
सुनील झंवरचा गुन्ह्यातील असा आहे सहभाग
सुनील झंवर हा गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. यापूर्वी अटक केलेला आरोपी सुरज झंवर हा त्याचा मुलगा असून त्याच्या भागीदारीत विविध संस्था/कंपन्या असून त्या कंपन्यांच्या नावाने या आरोपीने पूर्वनियोजित कट करून भाईचंद हिराचंद मल्टिस्टेट पतसंस्थेच्या मालमत्ता विक्रीच्या लिलावात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. सदरची लिलाव प्रक्रिया ही केवळ कागदपत्री वेबसाईटद्वारे भासविले आहे. प्रत्यक्षात सदरची प्रक्रिया ही सर्व टेंडर अटक आरोपी व त्यांच्या संबंधितांना मिळतील या दृष्टीने नियंत्रित केली होती.
सुनील झंवर हा श्री साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी व श्री सालासार ट्रेडिंग कंपनीमध्ये भागीदार आहे. या दोन फर्म/कंपनीच्या बँक खात्यावरून निविदा धारकांचे बँक खात्यावर पैसे वर्ग करून त्यांचे मार्फत तिचे स्वतःकरिता टेंडर भरले आहेत. या सर्व कंपन्या कागदोपत्री वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यातील आर्थिक व्यवहार एकत्रित असून या कंपन्यांच्या/ भागीदारी संस्था च्या बँक खात्यावरून मोठ्या रकमा वारंवार एकमेकांकडे वर्ग झालेल्या आहेत.
हि आहेत ती २२ लोकं
सुनील झंवरने पूर्वनियोजित कट त्यानुसार इतर आरोपींशी संगनमत करून बहुतांशी ई- टेंडरिंगमध्ये आपल्या संस्था व त्यांचे शालेय पोषण आहाराचे कामासाठी वाहन पुरविणारे ठेकेदार, पोषण आहार पुरविणारे सब ठेकेदार यांच्या नावे टेंडर भरलेले आहेत किंवा इतरांच्या नावे भरलेल्या टेंडरमध्ये त्यांना प्रतिनिधी म्हणून पाठविलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने १) आलोक शिवानी, २) हैदर पिंजारी, ३) मनिष मराठे, ४) सौरभ केदारी, ५) रोहित कोठारी, ६) निरंजन कोठारी, ७) प्रशांत महामुनकर, ८) राजेंद्र माळी, ९) मेहेगाराम सैनी, १०) कैलास धुत, ११) अरुण सोनार, १२) जितेंद्र बडगुजर, १३) अनुपम कुलकर्णी, १४) सुदेश भन्साळी, १५) धीरज सोनी, १६) जितेन्द्र तातेड, १७) योगेश लढ्ढा, १८) मयूर इंद्राणी, १९) केतन मालू, २०) नितिन भन्साळी, २१) आकाश माहेश्वरी, २२) छगन कोरडे तसेच साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी व श्री सालासार ट्रेडिंग कंपनी यांच्या नावे टेंडर भरलेले आहेत. तसेच टेंडर धारकांच्या बँक खात्यात श्री साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीच्या खात्यातून पैसा वळता करून त्यांच्या मार्फतीने ई-टेंडर प्रक्रिया पारदर्शी आहे असे भासविण्यासाठी त्यांनाही टेंडर भरायला लावले.
दरम्यान, सदरच्या मालमत्ता अत्यंत कमी किमतीत अटक संशयित आरोपी सुनील झंवर यांच्या संस्था व आपले सालासर कंपनीमधील पूर्वाश्रमीचा भागीदार योगेश लढद्याच्या नावे खरेदीचा दाखवलेला कमी रक्कमेचा मोबदला सुद्धा पूर्णपणे न भरता त्यात इतर ठेवीदारांच्या मुदत ठेवीच्या पावत्या बेकायदेशीररित्या वळत्या करून या मालमत्ता खरेदी व्यवहारात संगनमताने व पूर्वनियोजित कट अनुसार अपहार केल्याचा आरोप पोलिसांनी झंवरवर ठेवला आहे.
विजय वाघमारे (9284058683)
















