जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित उद्योजक सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह इतर आरोपींच्या शोधार्थ राज्यभरात पोलिसांची तीन पथकं रवाना करण्यात आली आहेत.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे फरार आहेत. यातील अवसायक कंडारे यांच्या वाहन चालकाने त्यांना अहमदनगर ते औरंगाबादच्या दरम्यान सोडले होते. दुसरीकडे सुनील झंवर हे नाशिकमध्ये आश्रय घेण्यासाठी येणार असल्याचे कळल्यामुळे पोलिसांनी आधीच तेथे सापळा रचला होता. परंतू झंवर तेथे आलाच नाही. दरम्यान, सर्व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.